नाच रे चोरा हा माझा ऑनलाईन विडंबन संग्रह. या संग्रहामधे काही प्रस्थापित लोकप्रिय गाण्यांची मी केलेली विडंबनं संग्रहित केली आहेत. यातील बहुतांशी विडंबनं ही 2002 ते 2004 या दरम्यान लिहिलेली आणि मायबोली.कॉम वर प्रकाशित झालेली आहेत. शिवय यातली काही विडंबनं ही लोकांनी कॉपी-पेस्ट करून ईमेलद्वारे मुक्तपणे वाटलेलीही आहेत. अशी वाटली गेलेली विडंबनं काही जणांनी काही ठिकाणी गाऊन, वाचून सादरही केलेली आहेत! खरंतर विडंबन गीताला आणि विडंबनकारालाही आपल्या समाजात फारशी प्रतिष्ठा मिळालेली दिसत नाही. अशा स्थितीत या विडंबनांचा झालेला प्रसार मला नेहमीच आश्चर्यकारक वाटत आला आहे.
विडंबनाचं शास्त्र किंवा नियमही कोणी केल्याचं मी कुठे पाहिलं, वाचलं ऐकलं नाही... विडंबनं करताना मी कोणते नियम पाळतो ते मी सांगतो:
- विडंबित गीत हे मूळ गाण्याच्या वृत्तामधे (किंवा चाली मधे) असावं. गण व मात्रांचा नियम पळावा (यमक व शब्द वेगळे असले तरी चालेल)
- विडंबीत गीताची कडवी ही अर्थपूर्ण असावीत, उगाच ओळींची खोगिरभरती नसावी. शक्यतो कडवी ही एकमेकंशी संबंधीत असावीत
- विडंबन करताना केवळ विनोदासाठी म्हणून अश्लीलता व बिभत्सता टाळावी (प्रत्येकाची या दोन्ही ची व्याख्या व मर्यादा वेगळी असु शकते) पण, जे विडंबित गीत आपण चार चौघांसमोर आणि चार चौघींसमोरही न लाज बाळगता सांगू शकू असच विडंबित गीत प्रकाशित करावं
- व्यक्तिगत आकसापोटी कुणाही कवीची रचना मोडण्यास घेउ नये! आणि विडंबित गीतातही व्यक्तिगत चिखलफेक टाळावी.
- काव्याचा हेतु जर नवनिर्मिती आणि व्यक्तिगत अनुभवाची अभिव्यक्ती हा आहे, तर तोच हेतु विडंबनाचाही असावा. विडंबन हे अस्तित्वात असलेल्या एखाद्या गीतच्या चालीत बसणार शक्यतो विनोद निर्माण करणार पण नवनिर्मित असंच काव्य असाव!