आपल्या दोघांमधे ही गॅप का?

प्रसाद शिरगांवकर

आपल्या दोघांमधे ही गॅप का?
ऐकतो मी लावण्या, तू रॅप का?

राहतो राणी तुझ्या हृदयात मी
शोधते आहेस गूगल-मॅप का!

नियम तुमच्या शर्यतीचे का असे?
रोज धावावा नव्याने लॅप का?

लाल पाणी वाहते धमन्यांतुनी
मग निळी, भगवी नि हिरवी कॅप का?

रक्त, किंकाळ्या अताशा रोजच्या
जाणिवांचे बंद झाले फ्लॅप का?

लोपल्या सार्‍या तुझ्या कविता कुठे?
बंद पडला अक्षरांचा टॅप का?

दूर जाताना असा का चेहरा?
सोडताना भावनांचे ट्रॅप का?

भेटते तेंव्हा मुकी ती राहाते
टाकते मग ऑर्कुटावर स्क्रॅप का?

Average: 7.7 (325 votes)