भाऊ म्हंजे आपला जीव की प्राण
भाऊंसाठी सारी जिंदगी गहाण
भाऊंचा वाढदिवस म्हणजे कार्यच घरचं
भाऊंच्या खुशीसाठी 'होऊ दे खर्च'
चाैकाचाैकात लावली भाऊंची पोष्टर
आपलं हे असंय...
आली लहर, केला कहर....
आपन पोष्टर लावलेली भाऊंना समजलं
सोताहा फोन करुन भेटायला बोलावलं
भाऊंचं राजापण, काल पण, आज पण
दाबून पाजलं समद्यांना, खाऊ घातलं मटण
रात्रभर केला आम्ही 'चियर्स', 'चियर्स' चा गजर
भाऊंचं समदं असं
आली लहर, केला कहर....
यंदाच्या टायमाला भाऊंना तिकीट नक्की मिळणार
अन भाऊ इतके पावरबाज, निवडून सुध्दा येणार
मग लाल दिव्याच्या गाडीतून भाऊ जेंव्हा फिरतील
आपले साले भंकस करण्याचे दिवस सुध्दा फिरतील
मग नाष्ट्यालाही मटण आणि चूळ भरायला बियर
यालाच तं म्हणतात
आली लहर, केला कहर….
पण भाऊंपेक्षा निघाला दादांचा मोठा वट
तिकीट काढलं दादांनी, भाऊंचा पत्ता कट
भाऊंचा अाला फोन, ‘खाल्ल्या मिठाला जागा’
दादांचा आला फोन, ‘भेटायला या, कामाला लागा’
मनात म्हणलं 'घो तिच्यायला
भाऊंचं शेपूट सोड, दादांची दाढी धर'
मग काय
आली लहर, केला कहर….