डोंबिवलीच्या चाळीमधली राजा आणिक राणी

प्रसाद शिरगांवकर

चाल: भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी

डोंबिवलीच्या चाळीमधली राजा आणिक राणी
डोक्यावरती पंखा नाही नळास नाही पाणी

भल्या पहाटे केंव्हा त्यांच्या नळास पाणी येते
झोपेतून ते उठण्या आधी पाणी निघून जाते
तळमजल्यावर जाउन आणतो रोजच राजा पाणी
डोक्यावरती पंखा नाही नळास नाही पाणी

तिला विचारी राजा इतके बील कसे चुकवावे
का वाण्याने महिनो महिने बील असे धाडावे
त्या राणीच्या हातात होती यादी केविलवाणी
डोक्यावरती पंखा नाही नळास नाही पाणी

त्या राणीचा चढतो पारा रोज डबा भरताना
त्या राजाचा उडतो गोंधळ कामाला जाताना
रोज रोजची सुरूच आहे त्यांची अशी कहाणी
डोक्यावरती पंखा नाही नळास नाही पाणी

त्या राजाला कळते आता आपली धडगत नाही
कर्जत लोकल चुकली आता दुसरी लवकर नाही
स्टेशन वरती उरून जाते एक उदास विराणी

डोंबिवलीच्या चाळीमधली राजा आणिक राणी
डोक्यावरती पंखा नाही नळास नाही पाणी

Average: 8.3 (89 votes)