आनंदाचं गांव - कवितांची आगळी वेगळी मैफील!

आनंदाचं गांव? ही काय भानगड आहे?
तुमच्या माझ्या आयुष्यात आनंदाचं गांव निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न आहे. आपल्या आयुष्यातले खड्डे चुकवत चुकवत आपल्याला आनंदाच्या गावापर्यंत नेऊ शकणार्‍या रस्त्याचा हा शोध आहे.

ह्या... काहीतरी काय...
आपण आयुष्यात फार फार जाच सहन केला आहे असं तुम्हाला वाटतं का? प्रेमात पडण्यापासून धडपडण्यापर्यंत आणि लग्नात तरंगण्यापासून संसारात गटांगळ्या खाण्यापर्यंत खूप खूप ठिकाणी तुम्हाला झब्बू मिळाले आहेत का? हे सगळे झब्बू घेत राहूनही हसत रहाणं आणि आनंदी होणं शक्य आहे का?

आपण फार फार हलाखीत आयुष्य जगत आहोत असं तुम्हाला वाटतं का? आपल्या रस्त्यांवर पावलोपावली पसरलेले खड्डे, खांबाखांबांवर लटकलेली थोर थोर माणसांची पोस्टर्स, आपल्याला जाचक वाटणारी हेल्मेट सक्‍ती वा त्रासदायक वाटणारं भारनियमन. हे सगळं सगळं आपल्या भोवती असूनही आपल्याला आनंदी होणं शक्य आहे का?

तुमचं म्हणणं काय आहे?
आहे! हे सगळं शक्य आहे. आपलं साधं सोपं आयुष्य साध्या सोप्या पध्दतीनं जगणं शक्य आहे! आजुबाजूच्या परिस्थितीकडे, महत्वाच्या नात्यांकडे आणि स्वतःकडेही थोड्याशा वेगळ्या नजरेनं बघता येणं शक्य आहे. असं बघून खळखळून हसणंही शक्य आहे. आणि असं हसत खेळत आपल्या हृदयात आनंदाचं गांव निर्माण करणंही शक्य आहे.

अच्छा... म्हणजे काहीतरी तत्वज्ञान...
नाही... यात फुकटचं तत्वज्ञान नाही. उपदेश नाहीत. भाषणबाजी नाही. विचारांचे डोस नाहीत. मला खूप समजलंय असा आव नाही. हा संवाद आहे. या गप्पा आहेत. तुमच्या माझ्या रोजच्या आयुष्यातल्या साध्या सोप्या घटनांवरच्या गप्पा. आणि त्याही अगदी हलक्या फुलक्या शब्दांमधे. या गप्पा, आणि हे शब्द काव्यमय अंगानं जातात एवढंच!

आई गं... कविता... नको... फार जड असतात बुवा!
नाही... या जड नाहीत... या वेगळ्या प्रकारच्या कविता आहेत. जड शब्द नाहीत. क्लिष्ट कल्पना नाहीत. रटाळ वाचन नाही. या अशा कविता आहेत ज्यातला प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कल्पना आपल्याला स्वतःचीच वाटते. यातली प्रत्येक कविता आपल्याशी गप्पा मारते आणि आपला हात हातात धरून आपल्याला आनंदाच्या गावापर्यंत नेते!

हुं... बघुया तर काय आहे ते!
हेच... हेच सांगायचं आहे मला.... एकदा येऊन बघा... एकदा ऐकून बघा... आनंदाचं गांव आहे तरी काय हे एकदा अनुभवून बघा... नाही पटलं तर सोडून द्या... आवडलं तर फारच उत्तम... आणि तुम्हाला ते आवडेलच ही मला खात्री आहे!

ओ के.. सांगा... जरा डिटेल्स सांगा!
तर, आनंदाचं गांव हा माझा हलक्या फुलक्या कवितांचा एक छोटासा कार्यक्रम... 20 मिनीटांपासून सव्वा तासापर्यंत (जसा वेळ उपलब्ध असेल त्यानुसार) हा कार्यक्रम मी करतो... 2002 पासून मी हा कार्यक्रम करत आलो आहे आणि आजवर लंडन व पुणे येथे याचे अनेक प्रयोग झाले आहेत...

कार्यक्रमाची एखादी झलक बघता येईल का?...

ही घ्या.....

आपल्याला आपल्या संस्थे मधे हा कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर जरूर संपर्क साधा...