गंऽऽऽ भाजणी

प्रसाद शिरगांवकर

चाल: गं साजणी, कुण्या गावाची तू गं राणी

गंऽऽऽ भाजणी
थालि पीठाची
किंवा चकलीची
आहे कशाची तू गं राणी
गं ऽऽऽ
आली थापुन
आणि भाजुन
थोडी लाजुन माझ्या पानी

थप थप थापण्याच्या
तालावर झाली दंग
तालावर झाली दंग
पाणीथोडं फार
मऊ मऊ झालं अंग
मऊ मऊ झालं अंग
कांदे दोन चार
लाभला तयांचा संग
लाभला तयांचा संग

माझ्या घरात
तुझी परात
येते वरात मझ्या पानी
गं ऽऽऽ
आली थापुन
आणि भाजुन
थोडी लाजुन माझ्या पानी

लोणच्याची फोड तुझ्या
चुरडतो अंगावरी
चुरडतो अंगावरी
तुपाचीही धार तुझ्या
ओततोय अंगावरी
ओततोय अंगावरी
ताजं ताजं दही लोणी
ठेवलंय बाजुवरी
ठेवलंय बाजुवरी

तुज्या वासानं
जीव हैरान
भूक बेभान येड्यावानी
गं ऽऽऽ
आली थापुन
आणि भाजुन
थोडी लाजुन माझ्या पानी

Average: 8.9 (55 votes)