कॉफी मंक - कॉफी+ रम ची लिक्योर

प्रसाद शिरगांवकर
coffee monk

Old Monk ही नुसती रम नाही, तर ती एक संस्कृती, एक परंपरा आहे! ओल्ड मंकचं नाव काढल्यावर ज्यांना आपल्या विशी-पंचविशीतले रोमांचित दिवस आठवतात ती मंडळी ह्या मद्यसंस्कृतीचे शिलेदार!

विशीतले दिवस, अंगात बेक्कार रग, डोळ्यांत जग जिंकण्याची स्वप्नं, पहिल्या पहिल्या प्रेमाची वगैरे नशा किंवा दुसऱ्या-तिसऱ्या प्रेमभंगांची दुःखं आणि खिसे सदोदित रिकामे! त्याकाळात दोन-चार मित्र जमले की हमखास ओल्ड मंकची साथ असायची. 'एक चपटी पर हेड’ आणि चकणा-जेवण TTMM असा साधा हिशोब असायचा. 

तिशीत पैसा, चाळीशीत प्रतिष्ठा वगैरे सोबतीला येते तेंव्हा ह्या 'रमे'चा हात सुटून व्हिस्की, स्कॉच, व्होडका वगैरे उच्चभ्रू ललना भोवती वावरायला लागतात. ऐन तारुण्यात, आपल्या स्ट्रगलच्या काळात साथ देणारी ही गरीबाघरची रमा आपल्यापासून दुरावते. क्वचित कधीतरी हिची आठवण येते. विशेषतः धोधो पाऊस पडायला लागला की येतेच येते.

तर सांगायचा मुद्दा असाय की मी कॉफी + ओल्ड मंकची लिक्योर केली! आणि एकदम भारी झाली!!

रेसिपी: ३५०मिली ओल्ड मंक आणि ३५० मिली ब्लॅक कॉफी एका बाटलीत भरून ठेवायची आणि आठवडाभर वाट बघायची!! बस!! आठवड्यानंतर कॉफी + रमच्या चवीची अफलातून लिक्योर तयार!! (मी इन्सटंट कॉफी वापरली, पण ब्रू केलेली कॉफीही वापरता येते. कॉफीत पाऊण कप साखर घातली होती. आपल्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी-जास्त करता येईल)

हे डेझर्ट ड्रिंक आहे. जेवण झाल्यावर हलकिशी नशा हवी असेल तेंव्हा ३० ते ६० मिली पेय मोठ्या ग्लास मध्ये घेऊन त्यात बर्फ घालून निवांत सिप करत पीत बसायचं असतं!!

तर पाऊस उंबरठ्यावर आलाय. अशात आपल्या जुन्या 'रमे'ची आठवण आलीच तर तिला कॉफीचा नवा साज चढवून ती, आय मीन ओल्ड मंक, पुन्हा एकदा आवडत आहे का हे बघायला हरकत नाही!!

Average: 9.5 (2 votes)