अद्रका: आल्याची झटपट झटका बियर!

प्रसाद शिरगांवकर
Ginger Ale - अद्रका

दारूची दुकाने बंद असल्याने तळमळणाऱ्या ‘सुधाकरां’साठी घरगुती झटपट बियरची रेसिपी! फक्त आलं, साखर, यीस्ट आणि पाणी इतक्याच सामुग्रीने ही बियर बनवता येते आणि दोन ते चार दिवसांत तयार होते!

अर्धा किलो आलं किसून घ्यायचं. मोठ्या पातेल्यात चार लिटर पाण्याला उकळी आणायची. त्यात एक किलो साखर घालायाची. साखर विरघळली की त्यात किसलेलं आलं घालायचं. पाचेक मिनीटं हे मिश्रण उकळू द्यायचं. गॅस बंद करून हे मिश्रण थंड व्हायची वाट बघायची. मिश्रण पूर्ण थंड व्हायच्या थोडंस आधी (म्हणजे थोडं कोमट असताना) त्यात चमचाभर यीस्ट घायालायचं. वाईन यीस्ट असेल तर उत्तम नाहीतर ब्रेडसाठी वापरतात ते ड्राय यीस्टही चालेल (किराणा मालाच्या दुकानात मिळतं).

मग हे संपूर्ण मिश्रण न गाळता, तसंच एका मोठ्या तोंडाच्या बरणीत भरून झाकण हलकं बंद करायचं. (आतली हवा बाहेर गेली पाहिजे, पण बाहेरचे जीवजंतू, चिलटं इत्यादी आत जाता कामा नयेत अशा बेतानं झाकण लावायचं).

दोन-चार तासांनी बरणी बघायची. आत बुडबुडे यायला सुरुवात झाली असेल तर यीस्टने आपलं काम सुरु केलं आहे आणि आपली बियर तयार होते आहे ह्याची खात्री बाळगून निवांत वाट बघत बसायचं.

यातून माइल्ड बियर (४% ते ५% alcohol असलेली) दोन-तीन दिवसांत तयार होते तर स्ट्राँग बियर (७% ते ९% alcohol असलेली) चार-पाच दिवसांत तयार होते.

आपल्या इच्छेनुसार हे मिश्रण दोन-तीन किंवा चार-पाच दिवसांनी स्वच्छ फडक्यातून गाळून घ्यायचं. खाली बराच चोथा जमलेला असेल त्याच्या मोहात पडायचं नाही, तो कंपोस्टमध्ये टाकून द्यायचा! साधारण तीन लिटर (७५० मिली च्या चार बाटल्या) भरून बियर हातात पडते.

मग ही फ्रीजमध्ये ठेवून थंडगार करायची आणि मग हमममम….

ही हलकीशी तपकीरी किंवा ब्राऊन रंगाची (किंवा कदाचित गढूळ दिसणारीही) होऊ शकते. थोडीशी गोडसर लागते आणि प्रत्येक घोटाला आल्याच्या तिखटपणाचा मस्त झटका बसतो!!

(यात थोडं variation म्हणून फर्मेंट करताना त्यात चार-पाच लिंबं पिळून टाकली तर मस्त आंबटसर चवही येते. फर्मेंट करताना टाकली नाहीत, तर पिताना त्यात थोडं लिंबू पिळून, चवीला मीठ टाकून वेगळ्याच प्रकारची तिखट-गोड-आंबट-खारट अशी एलही चाखता येऊ शकते)

Ginger Ale किंवा आल्याची बियर हे तसं बरंच जुनं पारंपारिक पेय आहे. आपल्याकडे फारसं प्रचलित नाही, पण सध्याच्या परिस्थित घरी करून बघता येण्यासारखं आहे!!

वैधानिक इशारा १ : अर्थातच, घराबाहेर न पडता घरच्या घरी ‘आलं' आलं तरच हे करून बघा!! उगाच छाती बाहेर काढून घराबाहेर पडू नका. जान है तो जहान है! सर सलामत तो वाईन पचास! वगैरे वगैरे!

वैधानिक इशारा २ : घरगुती बियर अथवा वाईनने अत्यंत हलकी रम्य नशा येते. ज्यांना एक-दीड क्वार्टर ‘मारल्या’शिवाय ‘टच’ही होत नाही किंवा ज्यांना पिऊन फुल टल्ली व्हायचं असतं त्यांनी ह्या दिशेला फिरकूही नये! ही तरल नशा देणारी कलात्मक पेयं आहेत, हातभट्टीच्या दारू नाहीत!!

असो. अद्रका करून बघा, कशी वाटतीये ते सांगा!! 

Average: 10 (1 vote)