मधुशाळा : घरगुती वाईन्स व मद्य!

प्रसाद शिरगांवकर
Wines

आमच्या बिल्डिंगला दरवर्षी मधमाशा सात-आठ भली पोठी पोळी करतात आणि त्यात भरपूर मध जमा होतो. मी दहाव्या मजल्यावर रहातो, त्यामुळे एक मोठ्ठं पोळं माझ्या टेरेसच्या खालीही दरवर्षी होतं. यंदा एक कारागीर माणूस आला आणि त्यानी त्यातलं मध आम्हाला काढून दिलं. बिल्डींगमधल्या अनेक जणांनी पातेली पातेली भरून मध घेतलं. मी ही.

ते मध घरी घेऊन आल्यावर, या एवढ्या मधाचं करायचं काय ते कळेना! महाबळेश्वरला वर्षातून एखाद्या होणाऱ्या ट्रिपमधे आणलेली पाव किलो मधाची बाटली आम्हाला दोनेक वर्षं पुरते! पण आता तर दोनेक किलो "घरचं" मध समोर होतं! मग जरा इंटरनेटवर सर्च मारला तर मधापासून वाईन करता येते असं समजलं, आणि करुन बघुया म्हणलं!

मधापासून वाईन (मद्य) तयार करणं हा माणसाचा जुना छंद आहे. जगभरातल्या बहुसंख्य संस्कृती आणि समाजांमध्ये याचा उल्लेख सापडतो. आपल्याकडेही हा प्रकार होत असावा (किंबहुना "मद्य" हा शब्दच "मध" किंवा "मधु" या शब्दापासून आला असावा असा माझा दाट संशय आहे!). आपल्याकडच्या जुन्या ग्रंथांमध्ये याच्या रेसिपीचा उल्लेख असेलही, पण तो मला माहित नाही. मी आपली इंटरनेटवरून रेसिपी शोधली आणि प्रयोग करून बघितला! आणि जमलासुध्दा!!

वरची घटना २०१५ मध्ये घडली. त्या नंतर वेगवेगळ्या फळांच्या वाईन्स करून बघण्याचा छंद मला लागला! त्यातही विशेषतः आपल्या महाराष्ट्रात पिकणाऱ्या फळांच्या वाईन्स किंवा लिक्योर्स करून बघुया म्हणून प्रयोग करत राहिलो. 

या प्रयोगांची माहिती फेसबुकवर टाकत रहायचो. तिथे अनेक वाईन्सच्या रेसिपीज खूप लोकप्रिय झाल्या आणि व्हायरल गेल्या. त्या सगळ्या इथे एकत्र प्रकाशित करत आहे. 

Average: 9 (6 votes)