सध्या खाण्या-पिण्याचा पदार्थांबद्दल आणि त्यातल्या शिरगावकरांच्या घरगुती प्रयोगांबद्दल लिहायची तार लागली आहे. आणि तार लागलीच आहे तर ज्याने तार लागू शकते अशा पदार्थ-पेयांबद्दलही लिहायला हवं. डिस्क्लेमर: ‘तार लागणे’ ही प्रक्रिया किंवा मद्य, वाईन हे शब्द नुसते वाचूनही, ‘ई बाई’ किंवा ‘अरे बापरे’ अशी ज्यांची प्रतिक्रिया होत असेल त्यांनी पोस्टचा पुढला भाग एखाद्या ऍडल्ड आणि समजुतदार व्यक्तीच्या सोबत असतानाच वाचावा!
तर घरच्या घरी वाईन बनवू शकणे ही आयुष्यात केल्याच पाहिजेत अशा पन्नास का पंचावन्न गोष्टींपैकी एक गोष्ट आहे असं कुठेतरी इंटरनेटवर वाचलं होतं. गेल्या दोन वर्षांमध्ये एकदा घरच्या ताज्या मधापासून वाईन बनवली होती (आमच्या टेरेसला दरवर्षी मोठी मधाची पोळी लागतात, त्याचं मध म्हणजे घरचंच मध!) आणि एकदा घरच्याच (भावाच्या शेतातल्या) ताज्या अननसांपासून. त्यातली अननसाची वाईन एका पार्टीला मित्र-मैत्रीणींनी गट्टम करून टाकली. मधाची वाईन अजून age करत ठेवली आहे!
तर गेल्या थंडीत सफरचंदाची वाईन करून बघावीशी वाटली. त्या प्रयोगाची ही गोष्ट!
वाईन किंवा वारुणी तयार करणं ही अगदी सोपी प्रक्रिया असते! कोणत्याही फळाच्या रसाला यीस्ट चं विरजण लावलं की त्या फळाच्या रसाची वाईन होते. अक्षरशः दुधाला बॅक्टेरियाचं विरजण लावलं की त्याचं दही होतं तसंच असतं हे! फरक एकच, दुधाचं दही एका रात्रीत होतं, फळांच्या रसाची वारुणी व्हायला किमान एक आठवडा, कमाल एखादं वर्षंही लागू शकतं! आणि याला वेळ लागत असल्याने पेशन्स ठेवणं आणि रसाची वारुणी बनवण्याच्या यीस्टच्या या कामात इतर बॅक्टेरिया वगैरे ढवळाढवळ करणार नाहीत याची काळजी घेणं हे आपल्याला करावं लागतं. या कामाच्या बाबतीत ‘शतप्रतिशत’ यीस्टच महत्वाचे असतात कोण्या ‘वाघ' बॅक्टेरियांशी त्यांची युती झाली आपल्या फळांच्या रसाचा शाहिस्तेखान बनून बोटं तरी तुटतात किंवा अफजलखान बनून कोथळाच बाहेर येऊ शकतो! म्हणून बाकी कुठे असो वा नसो, वारुणी बनवताना शुचिता फार महत्वाची असते!!
हां, तर सफरमद्य कसं तयार करायचं! ताज्या सफरचंदांचा रस काढून घ्यायचा, तो शक्य नसेल तर कोणतंही प्रिझर्वेटिव नसलेला सफरचंदांचा रस विकत आणायचा (मी हे केलं). तो एका बाटलीत भरायचा. त्यात यीस्ट टाकायचं. पाव-नान वगैरे करण्यासाठीचं यीस्ट किराणामालाच्या दुकानात मिळतं, तेही चालतं (पण त्याला थोडीशी मातकट चव येऊ शकते म्हणून मी गेल्या अमेरिकावारीत 'शॅंपेन यीस्ट' आणलं होतं, ते टाकलं.) तयार होणाऱ्या वाईनमध्ये अल्कोहोलचं प्रमाण थोडं जास्त असावं असं वाटलं तर यात थोडी साखरही टाकावी. (जितकी जास्त साखर तितकं अल्कोहोलचं प्रमाण जास्त पण चव कमी, आणि जितकी कमी साखर तितकी मूळ फळाची चव जास्त, आपल्याला काय हवंय हे आपण ठरवावं!).
हे यीस्ट प्रकरण फार भन्नाट असतं. हे कुंभकर्णाचं अवतार असतं! वर्षानुवर्षं ते निर्जीव अवस्थेत, झोपून राहू शकतं. पण खायला-प्यायला-जगायला योग्य वातावरण मिळालं की ते ‘जिवंत’ किंवा जागं होतं. जागं झाल्यावर ते फक्त ‘साखर’ खातं! फळांच्या रसातली साखर (आणि त्यात आपण एक्ट्रा टाकलेली साखरही). खालेल्या साखरेचं ते अल्कोहोल मध्ये रुपांतर करतं. (आणि हे करताना कार्बन-डाय-ऑक्साईडही तयार होतो.) यीस्ट हे कोणत्याही पक्षाच्या गल्ली-बोळातल्या कार्यकर्त्यांसारखं असतं. निवडणुका आल्या की हे गल्ली-बोळातले कार्यकर्ते दिवसरात्र झटून काम करतात आणि साखरेचं रुपांतर अल्कोहोल मध्ये (पक्षी: जनमताचं रुपांतर मतांमध्ये) करतात आणि साखर (निवडणुका) संपल्या की पुन्हा निद्रिस्त होतात. तसंच काहीसं!!
पण ते असो. तर मी सफरचंदांचा दोन लिटर रस एका बाटलीत भरला. त्यात एक चमचाभर शॅंपेन यीस्ट टाकले. त्या यीस्टला पष्टिक खाद्य म्हणून थोड्या मनुकाही टाकल्या. आणि त्या बाटलीच्या तोंडाला एक छोटंसं छिद्र पाडलेला फुगा लावून ठेवला. आता छिद्र पाडलेला फुगा का? तर ते कार्बनडाय ऑक्साईडचं लक्षात आहे ना? तो तयार होतो, तो बाहेर पडावा, पण तो बाहेर पडताना इतर बॅक्टेरिया आत जाऊन त्यांची युती होऊ नये म्हणून हा उद्योग!
हे सगळं केल्यावर सफरचंदांच्या रसाची आठवड्याभरात सफरचंद-वारुणी किंवा सफरमद्य तयार झालं. जरा cloudy, ढगाळ दिसत होतं. देशी दारू सारखं. चव मस्त होती. पण दिसायला भारी नव्हतं. मग ते बाटलीत भरून नीट ठेवून दिलं. आणि आता तीन महिन्यांनी ते भन्नाट सोनेरी दिसत आहे आणि चव तर अफलातूनच आहे. !!
सफरमद्याच्या दोन बाटल्या तयार आहेत. पण आत्ता पिणार नाही. ज्या दिवशी सकाळपासून अफाट भीषण उकडेल आणि संध्याकाळी अशक्य दाटून येऊन कडकडून धो धो पाऊस कोसळेल त्या संध्याकाळी उघडायचा प्लॅन आहे!!
बाहेर धो धो कोसळणारा वळवाचा पाऊस, समोरच्या बशीतली गरमागरम कांदाभजी आणि हातात स्वतः तयार केलेल्या सफरमद्याचा पेला.!
स्वर्ग ही आपल्या हातानं तयार करण्याची आणि ह्या पृथ्वीवरच अनुभवण्याची गोष्ट आहे!