प्राचीन भारतातली मद्यसंस्कृती

प्रसाद शिरगांवकर
wine jar

प्राचीन भारतामाध्ये अत्यंत समृद्ध मद्यसंस्कृती असण्याची मोठी शक्यता आहे. 

वेदांमध्ये उल्लेख असलेलं सोमरस नावाचं एक गूढ पेय आपल्याला माहित आहे. पुराणांमध्ये असलेल्या समुद्रमंथनाच्या कथेत समुद्रमंथनातून निघालेल्या रत्नांमध्ये ‘सुरा’ नावाचं एक रत्न आहे. रामायण आणि महाभारतात ‘मद्याचे-मद्यपानाचे’ भरपूर उल्लेख आहेत. त्यापुढच्या कौटिल्याच्या अर्थशात्रात तर वेगवेगळ्या प्रकारची मद्यं आणि त्यावर सरकारनं किती टॅक्स लावावा, तो कसा गोळा करावा याच्या गाईडलाईन्स आहेत. रोमन संस्कृतीचा इतिहास पाहिला तर, त्याकाळी त्यांच्याकडून तेंव्हाच्या समृद्ध भारताबरोबर होणाऱ्या व्यापाराचे उल्लेख आहेत. त्यामध्ये रोमनांकडून भारतामध्ये सर्वांत जास्त प्रमाणात ‘आयात’ केला जाणारा माल हा त्यांच्या वाईन्स असायचा असा उल्लेख आहे. 

आता या सगळ्यामधला अतिप्राचीन ‘सोमरस’ नेमका काय होता याचा अजून शोध लागलेला नाही. ‘सोम’ नावाच्या झाडापासून मिळणारा रस, दूध-मध इत्यादी गोष्टींमध्ये आठ-दहा दिवस फर्मेंट करून मिळणारं पेय होतं असे उल्लेख आहेत. सोम हे झाड नेमकं काय होतं ह्याविषयी तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. आणि त्यापासून सोमरस तयार करण्याची नेमकी प्रक्रिया काय होती हेही स्पष्टपणे समजत नाही, त्यामुळे ते काय होतं हे समजायला वाव नाही. 

‘सुरा’ मात्र धान्यांपासून, त्यातही कदाचित जवापासून (barley) तयार केलेलं अल्कोहोलिक पेय होतं. धान्यांपासून केलेलं पेय म्हणजे एल किंवा बियर. पुराणकाळात त्याचे उल्लेख असल्याने पुराणकाळात भारतात बियर बनत होती हे मानायला वाव आहे. 

रामायण-महाभारतातली मद्यं ही मध किंवा इतर फळांपासून तयार केलेली असावीत. भैरप्पांच्या ‘पर्व’ ह्या पुस्तकातले संदर्भ पाहिले तर अनेक प्रकारच्या फळांपासूनची मद्यं तयार करण्याच्या पद्धती महाभारत काळात होत्या हे मानायला वाव आहे. मध आणि फळांपासूनची मद्यं म्हणजे मीड्स, सायडर्स आणि वाईन्स! 

कौटिल्याच्या काळात ह्यातल्या अनेक प्रकारच्या पेयांचं थोडंफार डॉक्युमेंटेशन आहे. कोणत्या पेयाला काय म्हणावं, त्यात काय काय असतं, काय प्रमाणात असतं, ते कसं तयार करायचं याचे उल्लेख कौटिल्याच्या अर्थशास्त्रात आहेत. म्हणजे तोवर बियर्स, मीड्स, सायडर्स, वाईन्स ह्यांचे भरपूर प्रकार समाजात असणार आणि त्यांचं बऱ्यापैकी सेवन होत असणार. 

बरं, वेदकाळ म्हणजे इ.स.पूर्व दीड ते दोन हजार वर्षं. म्हणजे आजपासून साडेतीन-चार हजार वर्षं मागे. तेंव्हापासून ते रोमनकाळ म्हणजे इसवीसनाच्या सुरुवातीचा काळ. म्हणजे आजपासून दोन हजार वर्षं मागे. तर त्या आजपासून चार हजार ते दोन हजार वर्षं मागे असलेल्या दोन हजार वर्षांच्या काळात, तेंव्हाच्या जगातल्या समृद्ध असलेल्या भारतात मद्यसंस्कृती होती ह्याचे भरपूर उल्लेख सापडतात. पण त्याचं व्यवस्थित शिस्तशीर डॉक्युमेंटेशन मात्र सापडत नाही. 

म्हणजे अनेक प्रकारची मद्यं होती तर ती तयार कशी करायचे? त्यांच्या रेसिपीज काय होत्या? ती लोक घरी तयार करायचे का त्यांचे कारागीर असायचे? ती विकणारी दुकानं कशी असायची? तेंव्हाची मद्यालयं किंवा पब्ज कसे असायचे? तिथे वातावरण काय आणि कसं असायचं? सरकारं काय टॅक्स लावायची? दारू परवडायची का? लोक मद्याधीन, व्यसनाधीन व्हायचे का? प्यायला किंवा किमान 'सोशल ऑकेजन्सना ड्रिंक' करायला समाजमान्यता होती का? 

ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कुठे एकाच ठिकाणी मिळत नाहीत. कुठे त्यांचं एकत्रित डॉक्युमेंटेशन केलेलं सापडत नाही. निदान आपल्याकडच्या तेंव्हा लिहिलेल्या कोणत्या ग्रंथांमध्ये हे एकत्रितपणे सापडत नाही. 

Sexual pleasures सारख्या अत्यंत व्यक्तिगत आणि exotic गोष्टीचं ‘कामसूत्राच्या’ रूपानं डॉक्युमेंटेशन करून ठेवणाऱ्या तेंव्हाच्या आपल्या समृद्ध आणि प्रगल्भ समाजात मद्याचं आणि मद्यसंस्कृतीचं डॉक्युमेंटेशन कसं नाही असा प्रश्न मला नेहमी पडतो. 

खरंतर ‘कामसूत्र' सारखा ‘सोमसूत्र' नावाचा ग्रंथ असायला हवा होता. किंवा एखादं पुराण, उपनिषद, आरण्यक असं काहीतरी मद्याशी, मद्य निर्मितीशी, मद्यसंस्कृतीशी संबंधित असायला हवं होतं. पण ते नाही.

हे का नसावं हे मोठं कोडं आहे. किंवा असेल पण कालौघात नाहीसं झालं असेल. किंवा असेल, पण अजून आपल्याला सापडलं नसेल! 

मी शोधतोय. तुम्हाला काही संदर्भ माहित असतील तर अवश्य सांगा! 

Average: 8 (1 vote)