तर 'प्रसादा'दित्याने आपला हट्ट सोडला नाही. पेरू आणि कोकमच्या वाईनच्या यशस्वी प्रयोगानंतर 'करवंदाची वाईन करता येईल का?' ह्या प्रश्नाच्या वेताळाला खांद्यावर घेऊन प्रसादादित्य निघाला!!
माझे सिनियर मित्र अण्णा उर्फ Avadhut Bapat मदतीला धावले. त्यांचे शाळामित्र अश्विन खरे यांच्या करवी जुन्नरजवळच्या आदिवासी गावात गोळा केलेली मस्त पिकलेली ताजी करवंदं त्यांनी मिळवून दिली. एखादा किलो द्या म्हणलं होतं तर अश्विनरावांनी पाच किलोचं मिनी पोतंच हातात ठेवलं माझ्या!! (मी, अण्णा आणि अश्विन तिघंही नूमवीय! भारीच्या शाळेत गेल्याचा हा असा फायदा होतो बघा!!)
मग पुढे केलेला प्रयोग असा:
अडीच किलो करवंदं स्वच्छ धुवून घेतली. (काही करून त्यावरचा चीक जात नाही हे लक्षात आलं, तो तसाच ठेवला!!). ती करवंदं जाड बुडाच्या पातेल्याखाली रगडून क्रश करून घेतली. (इथे घरात वरवंटा असायला हवा होता हे लक्षात आलं. ह्या मिक्सर ग्राइंडरने पारंपारिक उपकरणांवर वरवंटा फिरवलाय. पण ते असो). तर क्रश केलेल्या करवंदांमधूनही बिया वेगळ्या करणं केवळ अशक्य आहे हे लक्षात आलं (याचं मशीन केलं पाहिजे कोणीतरी).
मग तो तसाच बियांसकटचा करवंदाचा लगदा मोठ्या पातेल्यात घेतला. त्यात एक किलो साखर आणि चार लिटर पाणी घातलं. हे मिश्रण छान उकळून घेतलं. (साखर विरघळावी आणि पाण्यात करवंदाचा रस मिसळावा म्हणून उकळलं).
(ज्यांना वाईन वगैरे नको आहे त्यांनी इथेच थांबलं तरी चालेल. कारण हे मिश्रण म्हणजे करवंदाचं भन्नाट सरबत झालं होतं!!)
मग हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात चमचाभर वाईन यीस्ट टाकले आणि स्टीलच्या पिंपात किण्वन करायला ठेवून दिलं. (किण्वन म्हणजे fermentation. fermentation ह्या रुक्ष शास्त्रीय शब्दापेक्षा किण्वन हा फारच रोमँटिक वाटतो मला!!)
चोवीस तासाने किण्वन सुरु झालं. अठ्ठेचाळीस तासांत फारच जोरदार किण्वन व्हायला लागलं होतं.
मग सुरु झाला तो पेशन्स गेम!! साधारण आठवडाभर किण्वन होऊ दिलं. मग पिंपातलं मिश्रण गाळून घेतलं त्यातला चोथा आणि बिया वगैरे टाकून दिल्या. उरलेलं मिश्रण सेटल होण्यासाठी एका मोठ्या बरणीत भरून ठेवलं.
मग अजून तीन आठवडे वाट बघितली. या काळात थोडं थोडं किण्वन होतच होतं. आणि मिश्रणातले उरलेले घन घटक तळाशी जमत चालले होते.
तीन आठवड्यांच्या शेवटी अत्यंत स्वच्छ पारदर्शी वाईन मिळाली. हिला करवंदांचा हलकासा वास आहे. करवंदांची तुरट-गोडसर चव आहे. आणि अत्यंत मादक गुलाबी रंग आहे!!
हिच्यातलं अल्कोहोलचं प्रमाण तब्बल १०.२५% आहे. (म्हणजे द्राक्षापासूनच्या रेड वाईन इतकं!)
ह्या करवंदाच्या वाईनचा रंग, हिची चव आणि अल्कोहोल कंटेंट सारंच पाश्चिमात्य द्राक्षाच्या वारुणीच्या तोडीचं दिसत आहे. पुरेसा रीसर्च करून हिची वाईन डेव्हलप केली तरी आपल्या सह्याद्रीची ही 'डोंगरची मैना' परदेशी रेड वाईनला कांटे की टक्कर देऊ शकेल!!
सध्या मी हिचं नाव 'करवंदी' ठेवलं आहे. माझा बॉलिवुडप्रेमी दोस्त Milind Padhye नं 'करीना' नाव सुचवलंय... any other suggestions are welcome!!
नावाचं ठीक... पण यात अजून प्रयोग करून ही खूप दर्जेदार वाईन करता आली तरच विक्रमादित्य अन वेताळ दोघंही खुष होतील!!