निंबुका : लिंबू आणि गुळाची झकास झटपट बियर!

प्रसाद शिरगांवकर
निंबुका - lemon wine

 ‘अद्रका'च्या घवघवित यशानंतर शिरगावकर घेऊन येत आहेत तिची बहिण ‘निंबुका’: लिंबाची झटपट घरगुती बियर!!

तर झालं असं, की अद्रकाची, म्हणजे आल्याच्या बियरची रेसिपी खूप व्हायरल गेली. मग लोक विचारायला लागले की ‘आलं उष्ण पडेल का?’ किंवा सांगायला लागले की 'आलं आम्हाला आवडत नाही, दुसरं काही करत येईल का?’ मग शिरगावकर बाह्या सरसावून कामाला लागले आणि ही नवी रेसिपी करून बघितली!!

ह्या बियरची रेसिपी आल्याच्या बियरपेक्षाही सोपी आहे! साधारण दोनशे ग्रॅम गूळ (फोडलेला किंवा पावडर) एका बरणीत घेतला. त्यात दोन मध्यम आकाराच्या लिंबांच्या पातळ चकत्या करून टाकल्या. त्यावर साधारण एक लिटर गरम पाणी (उकळी येण्याच्या थोडं आधीचं) ओतलं. गूळ विरघळेपर्यंत हे मिश्रण ढवळलं. हे मिश्रण पूर्ण गार व्हायच्या आधी, थोडंसं कोमट असतानाच, त्यात अर्धा चमचा यीस्ट टाकलं. चार-सहा मनुका टाकल्या. आणि झाकण अर्धवट बंद करून बरणी घरातल्या उबदार कोपऱ्यात ठेवून दिली.

थोड्याच वेळात गुळाच्या मिश्रणाला लावलेल्या यीस्टच्या विरजणानं आपलं काम सुरु केलं आणि बरणीत थोडेथोडे बुडबुडे दिसायला लागले. (यीस्ट साखर खातं आणि त्याचं अल्कोहोल आणि कार्बन डायोक्साइडमध्ये रुपांतर करतं. यीस्टला थोडं घन खाद्यही लागतं म्हणून यात मनुकाही टाकल्या आहेत.)

मग निवांतपणे चार-पाच दिवस यीस्टला त्याचं काम करू दिलं. बुडबुड्यांचं प्रमाण कमी झाल्यावर हे मिश्रण गाळून घेतलं. लिंबाचा आणि मनुकांचा चोथा काढून टाकून पुन्हा बरणीत भरलं. त्यात आता थोडे लवंग आणि वेलची टाकून हलकं झाकण लावून आणखी एक दिवस बंद करून ठेवलं.

अन आज बरणीतलं पेय पुन्हा एकदा गाळून घेतलं आणि बाटल्यांमध्ये भरून फ्रिजमध्ये ठेवून थंडगार केलं.

रविवारची घरातली सर्व कामं झाल्यावर एक ग्लास भरून घेऊन एक एक घोट घेत ही पोस्ट लिहितोय.

हे एक अद्भुत पेय झालं आहे! अत्यंत सुंदर लिंबू रंगाचं, गोडसर-आंबट-तुरट चवीचं, एकदम रिफ्रेशिंग!! याचा अल्कोहोल कंटेंट साधारण ६.५% आहे. म्हणजे माइल्ड बियरपेक्षा स्ट्राँग पण स्ट्राँग बियरपेक्षा लाईट!! (गुळाचं प्रमाण कमीजास्त करून ही जास्त स्ट्राँग किंवा माइल्ड करता येईल). प्रयोग म्हणून ही एकच लिटर केली होती. इतकी कमी का केली याची शिरगावकरांना आता हळहळ होते आहे!! पुढची बॅच मोठी लावुया असं शिरगावकर ठरवत आहेत!!

तर, नेहमीच्याच महत्वाच्या सूचना:
१. उगाच घराबाहेर पडू नका. लिंबं आणि गूळ ‘होम डिलिव्हरी’त येणार असेल तरच हे ट्राय करा.
२. यात वापरलेलं यीस्ट हे साधं ब्रेड तयार करण्यासाठीचं Active Dry Yeast होतं. तेही नेहमीच्या किराणामालाच्या दुकानातून आणलेलं.
३. खरोखर घराबाहेर पडू नका. Stay home, stay safe, help your community to stay safe.

जाताजाता: ‘मॅडम, तुम्ही लिंबू कलरच्या साडीमध्ये फार छान दिसता’ हा डायलॉग ज्यांना आठवतो, त्या पिढीला ही ‘निंबुका’ जरा जास्तच सेक्सी वाटेल. त्यांनी ह्या बियरला निंबुका ऐवजी ‘अश्विनी’ म्हणायलाही माझी मनो’भावे’ हरकत नाही!!

- प्रसाद शिरगावकर

(किराणामालाच्या दुकानांमध्ये यीस्ट सध्या सहज मिळत नाहीये असं अनेक मित्रमैत्रिणी सांगत आहेत. तुम्हाला सहज मिळालं तर बघा, नाहीतर, सॉरी मित्रांनो!!)

Average: 6.3 (3 votes)