‘रसोत्तरा’ - अर्थात हापुसची वाईन!

प्रसाद शिरगांवकर
hapus wine

काय गंमत आहे माहित नाही, पण उन्हाळ्यात अफाट खावासा वाटणारा आंबा, पाऊस पडायला लागला की खावासा वाटत नाही! पावसाळ्यात आंबा तरी उतरलेला असतो किंवा त्यावरचं आपलं मन तरी! तरीही, वर्षंभर अधुनमधून चाखायला मिळावा म्हणून आपण त्याचा पल्प करून ठेवतो. मग पुढे त्या पल्पपासून आंबा-बर्फी, आंबा-वडी, आम्रखंड वगैरे करत रहातो. जॅम-मुरंबे-पोळ्या करून ठेवतो. आंब्याच्या फ्लेवरचं काही प्यायची इच्छा झाली तर मॅंगोला-फ्रूटी वगैरे नावाची फळांच्या राजाची अत्यंत गरीब अपत्यं बाजारात मिळतातच!

तर ते असो. धो-धो कोसळणाऱ्या पावसात किंवा कडाक्याच्या थंडीतही मनापासून आंब्याचा आस्वाद घेता येण्यासाठी आंब्याची वाईन करून बघुया असा विचार केला आणि कामाला लागलो! चार-पाच चांगल्या दर्जाच्या हापुस आंब्यांचा रस काढला. चार लिटर पाण्यात तो मिसळला. त्यात एक किलो साखर टाकली. हे सगळं मिश्रण हॅंड-मिक्सरनी एकजीव करून घेतलं आणि एका मोठ्या बाटलीत भरून त्यात चमचाभर यीस्ट टाकलं. 

दोन-चार तासांत यीस्टनी किण्वनाचं काम सुरु केलं. (बाय द वे fermentation ला मराठी मध्ये किण्वन हा अतीशय सुंदर शब्द आहे! या शब्दावरून थेट पेल्यांची किण-किणच आठवते! ). मग आठवडाभर शांतपणे वाट बघितली. आठवड्यानंतर बाटलीत जे झालं होतं ते उघडून बघितलं. लाईट आंबा (खरंतर पिवळ्याच) रंगाचं एक पेय तयार झालं होतं. वास घेऊन बघितला तर अल्कोहोलच्या आंबुस वासासोबत हापुसचा हलकासा सुगंधही येत होता. हायड्रोमीटरनं तपासून पाहिलं तर अल्कोहोलचं प्रमाण १०.५% आलं.. म्हणजे द्राक्षांच्या रेड-वाईनच्या आसपास! मग जरा थंड करून चव घेऊन पाहिली तर बाजारात मिळणाऱ्या मॅंगो ड्रिंक्सपेक्षा अक्षक्य वरच्या दर्जाची चव देणारं पेय तयार झालंय हे लक्षात आलं!! मग ही हापुस वाईन गाळून वगैरे घेऊन बाटल्यांमध्ये भरून मुरवायला ठेवून दिली! 

एक बाटली फ्रिजमध्ये ठेवली. आज जराशी पावसाची भुरभुर झाली, संध्याकाळी आमची मैत्रिण शीतल गप्पा मारायला आली होती. मग गप्पा मारता मारता फ्रिजमधली वाईन संपूनही गेली!! 

जाता जाता: वाईन संबंधी काही संदर्भ शोधत होतो तेंव्हा कौटिल्याच्या (चाणक्य) अर्थशास्त्र ग्रंथातले वारुणीविषयीचे काही संदर्भ सापडले. (याविषयी सविस्तर नंतर कधीतरी). तर, त्यात आंब्यापासून तीन प्रकारची मद्यं तयार होतात असा उल्लेख होता आणि त्यातल्या एका प्रकारच्या मद्याचं नाव ‘रसोत्तरा’ होतं. मला खूप आवडलं. मग माझ्या ह्या प्रयोगातून निष्पन्न झालेल्या, फळांच्या राजाच्या ह्या अफलातून कन्येचं नाव मी ‘रसोत्तरा’ असंच ठेवलं आहे!! 

पुढे कधी भारतीय मद्यांची वायनरी वगैरे टाकलीच तर माझ्या ब्रॅंडचं नावही ‘रसोत्तरा’च ठेवीन कदाचित!! 

Average: 9 (2 votes)