अमसूला - अर्थात कोकमची वाईन!!

प्रसाद शिरगांवकर
kokum wine

मला कोकम सरबत प्रचंड आवडतं. रणरणत्या उन्हात जाऊन आल्यानंतर थंडगार कोकम सरबत पिणं हे निव्वळ स्वर्गसुख असतं.

अर्थात रणरणत्या उन्हामध्ये जाऊन आल्याबर थंडगार बीयर पिणं हे सुद्धा स्वर्गसुख असतं.

तर ह्या दोन्ही स्वर्गसुखांची युती (किंवा आघाडी म्हणा आपापल्या आवडीनुसार!) करता येतीये का असा प्रयोग करून बघुया म्हणलं आणि कोकमची वाईन (किंवा खरंतर cider) करुन बघायचं ठरवलं!

तीन लिटर पाण्यात पाऊण किलो साखर आणि चारशे मिलि कोकम आगळ घातलं (आगळ म्हणजे साखर नसलेला, नुसता कोकमचा अर्क) आणि त्याचं सरबत बनवलं.

या सरबतात पाव चमचा वाईन यीस्ट घालून ते फर्मेंट करायला ठेवलं.

यीस्ट ह्या गुणी बुरशीने सरबतातली साखर गट्टम करून तिचं अल्कोहोलमध्ये रुपांतर केलं आणि माझ्या चवदार कोकम सरबताची चवदार कोकम वाईन (cider) तयार झाली!!

साधारण वाईन्स आपल्या हवामानात आठ-दहा दिवसात तयार होतात. Somehow कोकमच्या सरबताचं fermentation खूपच slow होत होतं, आठदहा दिवसांनी जेमतेम २% alcohol असलेलं पेयं झालं होतं. (कदाचित आगळ मध्ये असलेल्या मिठामुळे असेल किंवा सरबतात यीस्टना पुरेसं खाद्य मिळत नसल्याने असेल)

मग यीस्टना थोडासा खाऊ म्हणून बेदाणे टाकले आणि निवांतपणे खूप पेशन्स ठेवून तब्बल दोन महिने वाट बघितली!!

फायनल प्रॉडक्टमध्ये कोकमचा अत्यंत सेक्सी मरून रंग आणि कोकमची अस्सल आंबट चव दोन्ही शिल्लक आहे, साखर पूर्णपणे संपल्यामुळे dry wine झाली आहे आणि त्याला मूळ आगळातल्या मिठाची हलकिशी चव आहे!! Final alcohol percentage is 6.5%, म्हणजे माईल्ड बियर पेक्षा थोडं जास्त आणि वाईनपेक्षा थोडं कमी!!

संध्याकाळचं प्रचंड उकडत असताना, खूप थंड केलेली ही वाईन घोट घोट घ्यायला फारच मजा येते आहे!! सोबत कोकणातलेच काजू असतील तर फारच भारी काँबिनेशन!!

कोकमपासून अमसूल बनतं, तशीच ही कोकमची कन्या ‘अमसूला'!! 

Average: 10 (1 vote)