माझ्या वाईनगिरीमधला लेटेस्ट प्रयोग जांभळाची वाईन! (लेटेस्ट म्हणजे गेल्या जून महिन्यात केला होता!)
या आधी मी अननस, मध, सफरचंद, कैरी, हापुस आणि कोकम यांच्या वाईन्स (किंवा सायडर्स / बियर्स) करून पाहिल्या होत्या. आपल्या इथल्या अजून कोणत्या फळाची करता येईल असा विचार करत असताना बाजारात जांभळं दिसली!!
जांभळांच्या वाईनची रेसिपी शोधली, तर कुठे मिळाली नाही! (पंजाबमध्ये कोणीतरी केलेला 'जांभळाच्या वाईनचे डायबेटीससाठीचे चांगले परिणाम' असा केलेला रिसर्च सापडला, पण त्यात रेसिपी नव्हती.)
मग इतर फ्रुट वाईन्सच्या रेसिपीनुसार स्वतःच्या मनानी करून बघू असं ठरवलं!!
बाजारातून किलोभर ताजी जांभळं आणली. हात आणि ओटा जांभळागार करत त्यांचा गर काढला! तो गर स्मॅश केला. त्यात अर्धाकिलो साखर आणि दोन लिटर पाणी घालून त्याचं मस्त जांभूळ सरबत तयार केलं. मग हे सरबत पाच लिटरच्या बिसलरीच्या रिकाम्या बाटलीत भरून त्यात पाव चमचा यीस्ट टाकले (मी अमेरिकेहून शँपेन यीस्ट आणलेत ते टाकले, ते नसतील तर साधे पावाचे यीस्टही चालू शकतात).
मग ती बाटली खळाखळा हलवून तिच्या तोंडाला एक छोटं छि्द्र पाडलेला मेडिकल हँडग्लोवचं घट्ट बसवला. (ह्याने बाहेरचे बॅक्टेरिया आत जात नाहीत, पण आतलं कार्बनडायॉक्साईड बाहेर जातं. ह्याला गरीबांचं 'एअर लॉक' म्हणतात!!)
दोनेक तासांत यीस्टनं आपलं काम सुरु केलं आणि सरबतात बुडबुडे दिसायला लागले. पुढचे आठ दिवस यीस्ट आपलं काम करत होतं, त्या सरबतातली साखर खाऊन त्याचं अल्कोहोलमध्ये रूपांतर करत होतं!
आठ दिवसांनी यीस्टचं काम थंड पडल्यावर त्या बाटलीतलं पेय गाळून घेतलं आणि दुसऱ्या साठवणीच्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरून ठेवलं.
ह्या सगळ्या प्रकारात गोंडस जांभळ्या रंगाची, अप्रतिम तुरट-गोडसर चवीची जांभूळ वाईन तयार झाली...!! (यातलं अल्कोहोलचं प्रमाण तब्बल १३%!!!)
आज १० महिन्यांनंतरही जांभळा रंग सुंदर दिसतोय. जांभळांची तुरट चव अजूनही लागत आहे. मात्र जराशी स्ट्राँग आहे ही वाईन... कमजोर हृदयाच्या लोकांनी लांबच रहावं!
हिचं नाव जांबुवंती, जामुन-वाईन वगैरे ठेवावं का असा विचार करत होतो... पण मग आपलं मराठमोठी 'जांभळी' असंच ठेवलं...
करून बघा... लै भारी पेय आहे हे!!