रमलेट : रम आणि चॉकलेटची लिक्योर!

प्रसाद शिरगांवकर
रमलेट

प्रेम हे एक रसायनशास्त्र आहे! म्हणजे, ज्या व्यक्तीशी आपली केमिस्ट्री जुळते तिच्यावर प्रेम जडतं हे आहेच. पण जेंव्हा आपण प्रेमात पडतो किंवा जेंव्हा जेंव्हा आपल्या हृदयातली प्रेमाची भावना जागी होते तेंव्हा तेंव्हा आपल्या मेंदूमध्ये 'फेनाईल-थायना-माईन' (फेथामा) नावाचं एक रसायन तयार होतं!! प्रेमात पडल्यावर 'लै भारी' वगैरे जे वाटतं ते ह्या रसायनामुळे. 'आज मै उपर, आसमाँ निचे' सारख्या दीडेक कोटी प्रेमगीतांचा जन्म ह्या रसायनापोटी झाला आहे!

तर सांगायचा मुद्दा असाय, की आपण जेंव्हा चॉकलेट खातो, तेंव्हा सुद्धा हे फेथामा रसायन मंद प्रमाणात मेंदूत तयार होतं अन आपल्याला लै भारी वाटतं!! चॉकलेट आणि प्रेम ह्यांचं एक अतूट नातं, एक केमिकल कनेक्शन आहे!!

ऑन द अदर हँड, रम आणि प्रेम ह्यांचंही एक अतूट नातं आहे. आपल्या 'रमे'च्या आठवणीत प्यायची असते ती 'रम' अशी व्याख्या कुठल्याशा पुराणात असेलच केलेली. आणि नसेल तरी, रमेच्या प्रेमात पडल्यावर किंवा धडपडल्यावरही रम जवळ केली जाते. शास्त्र असतंय ते!

तर सांगायचा खरा मुद्दा असाय की, चॉकलेट आणि रम ह्या प्रेमाशी अत्यंत जवळचा संबंध असलेल्या दोन रसायनांना एकत्र केलं तर काय तयार होईल असा प्रश्न शिरगावकरांना पडला. अन मग लागलीच त्यांनी घरगुती मधुशाळेत प्रयोग करून रम आणि चॉकलेटची लिक्योर तयार केली!!

रेसिपी एकदम सोपी आहे.

साहित्य: 

  • ३७५ मिलि (एक हाफ) रम, 

  • दीड कप पाणी

  • एक कप साखर

  • ५० ते १०० मिली कोको पावडर (प्रमाण आपल्या आवडीनुसार कमीजास्त करून बघा)

कृती:

गॅसवर पाणी गरम करायला ठेवा. पाणी गरम झालं की त्यात साखर आणि कोको पावडर घाला. एक उकळी येऊन साखर आणि कोको विरघळून एकजी मिश्रण झालं की गॅस बंद करा. हे मिश्रण (लिक्विड चॉकलेट) थंड होऊ द्या. 

थंड झालेलं लिक्विड चॉकेलेट आणि रम एका बरणीत एकत्र भरा. हे मिश्रण व्यवस्थित ढवळून बरणी बंद करून ठेवा. बरणी थंड आणि अंधाऱ्या जागेत ठेवून द्या. 

आठवड्याभराने ह्या बरणीतलं मिश्रण व्यवस्थितपणे गाळून घ्या. गाळलेलं मिश्रण बाटलीत भरून ठेवा. 

रम आणि चॉकलेट ह्यांचं मिश्रण म्हणून याला आपण रमलेट म्हणूया!! 

‘रमलेट’ आता पिण्यासाठी तयार आहे. हे थेट प्या, थंड करून प्या किंवा बर्फ घालून प्या! 

****

तर पावसाळा संपून गुलाबी वगैरे थंडी सुरु झालेली असावी. आपल्या रमेबरोबर आपली डेट ठरलेली असावी. (फक्त अनमॅरीड लोकांनीच डेटिंग करावं असं नाही. मॅरीड लोकांनीही आपल्या लग्नाच्या जोडीदाराबरोबर अधुनमधुन ठरवून 'डेट'ला जावं, लै भारी असतं ते!).

हां, तर आपली डेट ठरलेली असावी. मंद गुलाबी थंडी, कँडललाईट डिनर, भरपूर रोमँटिक गप्पा हे सगळं झालं की डेझर्ट ड्रिंक म्हणून ही रमलेट समोर यावी.

छोटा शॉट ग्लास भरून प्युअर चॉकलेट आणि रमचं मिश्रण. निव्वळ स्वर्गसुख!!

आपली रमा, रम आणि चॉकलेट ही प्रेमाच्या रसायनाची परमावधी!!

प्रेम हे एक रसायनशास्त्र आहे! आपल्याला अल-केमिस्ट होणं जमलं पाहिजे!!

Average: 10 (2 votes)