दारूविषयी

प्रसाद शिरगांवकर
Wines

दारू बद्दल आपल्या समाजात काही पक्क्या प्रथा आणि समज आहेत!

पहिली गोष्ट म्हणजे, ज्यामध्ये "अल्कोहोल" असतं आणि ज्यानं नशा चढते अशा कोणत्याही पेयाला आपण सरसकट "दारू" म्हणतो. चार-आठ टक्के अल्कोहोलवाली बियरही दारू आणि चाळीस-पंचेचाळीस टक्के अल्कोहोलवाली रम-व्होडका-व्हिस्कीही दारूच!

अल्कोहोल असलेल्या सर्व पेयांना असं सरसकट "दारू" म्हणणं म्हणजे घरातल्या कामवालीपासून ते दीपिका पादुकोन पर्यंत सर्वांनाच सरसकट "बाई" किंवा "महिला" म्हणण्यासारखं आहे! या प्रत्येकीचं आयुष्यातलं स्थान वेगळं असतं, प्रत्येकीचं साैंदर्यस्थळ वेगळं असतं, प्रत्येकीची नजाकतही वेगळी असते (मी दारू विषयी बोलतोय आता!). तरीही या सगळ्यांनाच सरसकट “दारू” म्हणणं हा या पेयांवरचा घोर अन्याय आहे! अर्थात, हा लेख दारूची सौंदर्यस्थळं आणि नजाकती या विषयी नसून दारू म्हणजे नेमकं काय असतं आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या दारवा कशा बनवतात, त्यांचा आपल्यावर नेमका काय परिणाम होतो या विषयी आहे! (जाताजाता: दारूचं अनेक वचन “दारवा” कसं वाटतंय? हा शब्द "मारवा"च्या जवळचा वाटतो की नाही? असो, पण तो विषय नाहीये इथे.!)

तर जगातल्या कोणत्याही फळाच्या रसापासून किंवा धान्याच्या अर्कापासून दारू बनवता येते आणि बनतेही. फळांच्या रसामध्ये ग्लूकोज असतं आणि धान्यांच्या अर्कामध्ये कार्बोहायड्रेट्स. यीस्ट नावाची एक जादुई बुरशी या रसाला किंवा अर्काला जेंव्हा लागते तेंव्हा ती या ग्लूकोज आणि कार्बोहायड्रेट्सचं रुपांतर अल्कोहोलमध्ये करते. आणि त्यांनी ही जादू केल्यानंतरचा हा अल्कोहोलमिश्रित रस किंवा अर्क प्यायला की माणसाला नशा चढते!

या जादूचा शोध माणसाला साधारण दहा-बारा हजार वर्षांपूर्वी लागला असावा असा अंदाज आहे. सुमारे बारा हजार वर्षांपूर्वीच्या, अश्मयुगातल्या माणसांकडे “दारू” तयार करण्याची दगडाची भांडी होती याचे पुरावे सापडले आहेत! तसंच जगातल्या सर्वच भू-प्रदेशांमधल्या सर्वच संस्कृत्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची “दारू” तयार केली जात होती आणि त्याचे गोडवेही गायले जात होते याचेही सर्वत्र विखुरलेले पुरावे आहेत! आपल्याकडेही वेद-काळापासून ते रामायण-महाभारत आणि अगदी कौटिल्याच्या अर्थशास्त्रापर्यंत सर्वत्र “सुरापानाचे” स्पष्ट उल्लेख आहेत.

पण ते असो.

तर सध्या, फळांपासून तयार केलेल्या दारूला वाईन (द्राक्षं) किंवा सायडर (सफरचंदं आणि इतर फळं) असं म्हणतात, धान्यांपासून तयार केलेल्या दारूला बियर आणि मधापासून तयार केलेल्या दारूला मीड म्हणतात.

थोडक्यात: वाईन, सायडर, बियर आणि मीड या, फळांचा रस, धान्याचा अर्क किंवा मधाला बुरशी लागून तयार झालेल्या “नैसर्गिक" दारवा! या सर्वच दारवांमध्ये अल्कोहोलचं प्रमाण दोन ते दहा-बारा-चाैदा टक्के एवढं असतं. या दारवा जशा आहेत तशाच्या तशा पेल्यात घेऊन आपण पिऊ शकतो आणि गेली दहा हजार वर्षं पीत आलो आहोत!

मग वाईन किंवा बियर या जर मूळच्या दारवा, तर व्हिस्की, व्होडका, रम पासून ते थर्रा, लठ्ठा, देशी, गावठीपर्यंच्या ज्यांना आपण खऱ्या दारवा समजतो त्या कधी आणि कशा तयार झाल्या?

या विषयी पुन्हा कधीतरी.!

(टीप: हा केवळ माहितीपर लेख आहे. मात्र कोणतीही गोष्ट अतिरेकी प्रमाणात केली की त्याचे भीषण दुष्परिणाम होतात अन दारूचं अतिसेवन आयुष्याची राखरांगोळी करू शकतं हे सतत लक्षात ठेवा)

Average: 8.5 (2 votes)