तुम्ही टकीलाचे शॉट्स मारले आहेत का कधी? छोट्या शॉट ग्लासमध्ये पन्नास मिली टकीला घ्यायची, हाताच्या मुठीवर मीठ ठेवायचं आणि दुसऱ्या हातात लिंबाची फोड. पटकन तो शॉट पिऊन वर मीठ आणि लिंबू चाखायचं. छाती जाळत ते ड्रिंक पोटात जाताना जाणवतं. पण अत्यंत बेचव किंवा विचित्र चव असल्याने मीठ / लिंबू खाऊन आपण तोंडाची चव शाबूत ठेवायचा प्रयत्न करतो.
तर, 'ड्रिंकचा असा जबरदस्त शॉट पाहिजे, पण विचित्र चवी ऐवजी भन्नाट चव असली पाहिजे' असं कसं करता येईल असा विचार करत होतो आणि त्यातून 'हापुसमयी' चा जन्म झाला!!
हापुसमयी हा माझ्या मधु-प्रयोग-शाळेतला ताजाताजा प्रयोग! ही वाईन नाही, तर लिक्योर (Liqueur) आहे. लिक्योर म्हणजे फळं, फुलं, मसाले यांच्या स्वादा-गंधाने मुरलेलं अल्कोहोलिक पेय (infused alcoholic drink). कॉफीच्या स्वादाची Kaluha, संत्र्याच्या स्वादाची Cointreau अशा काही प्रसिद्ध लिक्योर्स आहेत.
संत्र्याची होऊ शकते तर हापुसची पण होईल असा विचार केला आणि घरी कशी करायची याच्या रेसिप्या शोधल्या!
एक अत्यंत सोपी रेसिपी सापडली ती करून बघितली. एक पूर्ण बाटली व्होडका (750ml) आणि दोन छान पिकलेल्या रत्नागिरी हापुस आंब्यांचा रस एका काचेच्या बरणीत एकत्र करून ठेवला. आठवड्यानंतर हे मिश्रण वस्त्रगाळ करून आंब्याचा चोथा टाकून दिला आणि उरलेलं पेय बाटलीत भरून ठेवलं.
जे हातात आलंय ते विलक्षण महान पेय झालं आहे. हापुसचा रंग जसाच्या तसा ह्या पेयाला आला आहे. हापुसचा स्वाद आणि गोडवा पूर्णपणे ह्यात उतरला आहे.
हे पेय थंडगार करून छोट्या शॉटग्लासमध्ये घ्यावं, छोटे छोटे सिप घ्यावेत किंवा रप्पकन शॉट मारावा. निव्वळ स्वर्गसुख!!
सध्या या पेयाचं नाव मी 'हापुसमयी' असं ठेवलं आहे... नावासाठीच्या सूचनांचं स्वागत आहे!!
(एक पेग पिऊन झाल्यावर अल्पनानं याला 'व्होडांबा' असं नाव सुचवलंय! तिचा व्होडांबा आणि माझी हापुसमयी अशी दोन नावं झालीयेत!!)
(वैधानिक इसारा: यात अत्यंत high alcohol content असतो. त्यामुळे हापुसमयी कितीही गोड लागली तरी मर्यादेतच प्यावी!!)