नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी

प्रसाद शिरगांवकर

नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी
जो तुम्हाला भेटला तो देव म्हटला शेटजी!

एक वाटी शेंदराची सांडली रस्त्यावरी
अन तिथे तुमच्यामुळे बाजार भरला शेटजी...

का जुन्या मालाप्रमाणे वापरोनी फेकता?
एवढा का माणसांचा भाव पडला शेटजी?

का उभारू पाहता हे कारखाने, मॉलही?
वेष्टने कोरी जरी ही, माल सडला शेटजी...

पाहुनी उसन्या सुखांच्या जाहिराती रोजच्या
नेत्र थकले, कान किटले, जीव विटला शेटजी

भाविकांच्या रोख रांगा अन लिलावी दर्शने
मंदिरी येऊन तुमच्या देव फसला शेटजी

भाकऱ्या लाखो कशाला, चार नोटा वाटल्या
तृप्त झाले सर्व नेते, संप मिटला शेटजी!

मुक्त आहे या जगी सर्वत्र पाणी अन हवा
त्यातही करता कशाला रोज गफला शेटजी!

चार आणे? आठ आणे? वाढवा बोली जरा...
एवढ्या स्वस्तात कोणी जीव विकला शेटजी?

Average: 8 (79 votes)