साऱ्याच भांडणांचा बदलेल टोन आता

प्रसाद शिरगांवकर

साऱ्याच भांडणांचा बदलेल टोन आता
मुघलांस मावळ्यांचे जातील फोन आता!

झेंडे जरी निराळे, अन घोषणा निराळ्या
नेते परस्परांचे होतील क्लोन आता

खुपसावयास ठेवुन हाती सुरे दुधारी
मैत्री करावयाला जातील ड्रोन आता

तडजोड गारद्यांशी करतील रामशास्त्री
अन सावकार देखिल घेतील लोन आता

सरल्यात या लढाया, विरलीय शत्रुताही
ते वाटतील सारा हा ‘शांत-झोन’ आता

(फेसबुक लिंक: https://www.facebook.com/prasad.shir/posts/10152793109241411)

Average: 8.6 (7 votes)