सिटी टुरिझम

प्रसाद शिरगांवकर

प्राण्यांच्या काही टोळ्यांमध्ये
‘सिटी टुरिझम’ करण्याचं नवं फॅड आलंय!

येतात सिटी टुरिझम साठी
घोळकेच्या घोळके माकडांचे
बघतात टकामका
माणसं, रस्ते, बिल्डिंगा, वाहनं वगैरे
येतात दणादण झाडा-छपरांवर उड्या मारत
जातात कधी आपण होऊन, कधी हाकलल्या नंतर

येतात सिटी टुरिझम साठी
एकटे दुकटेच बिबटे
कधी नुसतेच फेरफटका मारून जातात
तर कधी ओढून नेतात
एखादी गाय, शेळी वगैरे

साप, सरडे वगैरे तर
नेहमीचे सिटी टुरीस्ट
कुठलंही परमीट वगैरे न काढता
कसलीच पूर्वसूचना न देता
बिनदिक्कत शहरांमध्ये फेर फटका मारणारे

यातले कुठलेच टुरिस्ट
जाताना मागे टाकत नाहीत
लेजची पाकिटं, कोकचे कॅन, बिसलरीच्या बाटल्या
किंवा सहज खेळ, गंमत म्हणून तोडत नाहीत अामची घरं
घरी डेकोरेशनला छान दिसेल
म्हणून तोडून नेत नाहीत कोणाचे दात, कातडी वगैरे
कापून टाकत नाहीत शहरंच्या शहरं
प्राण्यांसाठी महामार्ग बांधायला
किंवा टुरिस्ट स्पॉट्स डेव्हलप करायला

तरीही, बहुसंख्य सिटी टुरिस्ट्सना
ते केवळ आमच्या हद्दीत आले की
हुसकावून लावतो
किंवा
ठार मारून टाकतो आम्ही….
आणि जातो छानशा ‘नेचर टुरिझम’वर
प्राण्यांना त्यांच्या मूळ घरात बघण्यासाठी...

Average: 7.5 (2 votes)