ग्लोबल घसा!

प्रसाद शिरगांवकर

सकाळी उठल्या उठल्या
आसामातून आलेली चहा पावडर,
भिलवडी किंवा आणंद मधून आलेलं दूध,
भीमा-पाटस किंवा सांगलीतून आलेली साखर,
पानशेत-खडकवासल्यातून आलेल्या पाण्यात मिसळायची
आणि आखातातून-इराणमधून आलेल्या गॅसवर उकळून
त्याचा फक्कड चहा करुन प्यायचा

मग
त्याच पानशेत-खडकवासल्याच्या पाण्यात
हरयाणा-हिमाचलमधे बनलेल्या साबणाचा
दोन-चार बादल्या फेस करत आंघोळ करायची
गुजरातेत बनलेल्या टॉवेलनं अंग पुसून
गुजरातेतच बनलेल्या धाग्याचे, मुंबईत शिवलेले कपडे घालायचे

मग
जपान-जर्मनीत डिझाईन झालेल्या
पुणे-नॉईडात असेम्बल झालेल्या गाडीत
आखातातलं पेट्रोल जाळत
अॉफीसमधे पोचायचं
आणि दिवसभर
ओरिसातून आलेल्या कोळशावर
चंद्रपूरमधे बनलेली वीज वापरून
पंजाब-लुधियाणात बनलेला AC चालवून
काम करायचं

अर्थातच, सगळंच काम करायचं
ते चीन आणि चीन मधेच बनलेले
कॉम्प्युटर्स, मोबाईल्स आणि इतर गॅजेट्स वापरून

संध्याकाळी घरी येताना
क्वचित कधी पाऊस पडतो
भरभरून मृद्गंध दरवळतो
श्वासांश्वासांत तो गंध आपण भरुन घेतो

तोच तेवढा खराखुरा इथल्या मातीतला!!

हा गंध हृदयात भरून घेताना आपण म्हणतो
खूप दिवसांनी आला असा पाऊस
साला फारच ‘ग्लोबल वॉर्मिंग’ झालंय
काहीतरी केलं पाहिजे यार

हे म्हणता म्हणता
शांतपणे, नकळतच
त्याच आखातातलं पेट्रोल जाळणाऱ्या
जपानी गाडीत बसून जाताना
पंजाबातल्या बटाट्यांचे
गोव्यात तळलेले वेफर्स
शांतपणे आपल्या ‘ग्लोबल' घशात कोंबतो!

Average: 8.3 (8 votes)