प्रसाद शिरगांवकर

सिग्नलला गाडी उभी असताना
काचेपाशी गजरेवाला येतो
शेजारी 'मॅडम' आहेत बघुन
उगाच तिथे घुटमळतो
मी बायकोकडे बघतो
ती गजऱ्य़ांकडे बघत असते
मी, 'कसे दिले'
'पाच ला एक, दहाला तीन'
'दहाला चार दे की'
तो निमूटपणे चार गजरे तोडून देतो

सिग्नल सुटतो
पुढच्याच वळणावर आम्ही
दिमाखात एका मॉलच्या पार्किंगमधे शिरतो
पार्कींगवाला गुर्मीत अडवतो
मी 'कितना?'
तो (गुर्मीत) 'तीस रुपया'
मी निमूटपणे तीस रुपये काढून देतो
तासभर मॉलमधे मनसोक्त खरेदी होते
काउंटरवर येतो, कपड्यांचा ढीग टाकतो
पाच-सात हजाराचं बिल होतं
काउंटर शेजारी सुंदर पांढऱ्या रुमालांचा पॅक दिसतो
किंमत फक्त १०० रुपये
पाच-सात हजारांच्या खरेदीवर, द्या की फ्री शंभरचे रुमाल
म्हणावंसं वाटतं, पण जीभ रेटत नाही
गुमान झालेलं बिल देऊन बाहेर पडतो
घरी परत येताना,
कारच्या आरशाला लटकवलेले गजरे
छान दरवळत असतात
चार एेवजी तीनच असते

तरीही तितकेच छान दरवळले असते...

Average: 4.7 (9 votes)