मी रुमाल विकत घेतो
माझ्या नेहमीच्या मॉलमधून
मुळात तो असतो कापूस
दूरवरच्या कुठल्या शेताततला
तिथून तो जातो
सूत बनवण्याच्या फॅक्ट्रीमधे लांब कुठेसा
तिथून तो जातो
कापड बनवण्याच्या फॅक्ट्रीमधे लांब कुठेसा
तिथून तो जातो
रुमाल बनवण्याच्या फॅक्ट्रीमधे लांब कुठेसा
तिथून तो येतो
मालगाडी, ट्रकमधून माझ्या गावात
चकचकीत पॅक मधे बसून
आणि मांडला जातो काउंटरवर
चकचकित एसी मॉलमधे
या प्रवासात
दोनचार रुपयाच्या कापसाची किंमत
झाली असते शे दोनशे रुपये
मी घेतो तो विकत
ठेवतो खिशात रुबाबात
मग ढाळत बसतो अश्रू
महागाईबद्दल
ग्लोबल वॉर्मिंगबद्दल वगैरे
आणि मग पुसतो स्वतःचे डोळे
त्याच शे दोनशे रुपयांच्या रुमालानी!