प्रसाद शिरगांवकर

माझिया आतली मीरा बेभान नाचते आहे
तुझियात कृष्ण किनारा माझाच शोधते आहे

लाडक्या तुझ्या प्रेमाने अस्तित्व व्यापले माझे
प्रत्येक श्वास घेताना घुंगरू वाजते आहे

बोलते अता वा याशी, ऐकते अता ता यांचे
भासतो चंद्र हसलासा, मी उगा लाजते आहे!

पाहते वाट रात्रीची, येशील स्वप्ननगरीला
दिवसाच पाहते स्वप्ने, रातची जागते आहे

अंगणी तुझ्या गंधाने पेटून थांबण्यासाठी
प्राजक्त तुझा होण्याचे मी भाग्य मागते आहे

Average: 8 (4 votes)