मायबोली

प्रसाद शिरगांवकर

जातो जिथे जिथे मी नेतो हिच्या मशाली
जिंकून विश्व सारे, बोलेन मायबोली

एकेक अक्षरांच्या वाहुनिया पखाली
घालू सडे सुखाचे, शिंपून मायबोली

श्वासांत आज माझ्या होतात हालचाली
जेंव्हा समोर येते लाजून मायबोली

भाषेस जाळणारे सत्तांध जे मवाली
त्यांना कुशीत घेते प्रेमांध मायबोली

केला न सूर्य माझा त्यांच्या कुणी हवाली
ज्यांच्या सुरांत नाही माझीच मायबोली

माझ्या जिवास आहे, ही मूळची प्रणाली
ओठांत नेहमी या येईल मायबोली

राहो हातात काटे, ठेवू गुलाब गाली
राहो सदैव माझ्या ओठांत मायबोली

आई तुला ग माझी सांगू कशी खुशाली
दूतास आजही या समजे न मायबोलि

आलो जगात या मी ऐकून मायबोली
सोडीन प्राण माझे बोलून मायबोली

Average: 8.5 (13 votes)