तिला दूरदेशी कुठेसं जायचं होतं
‘मला जाग येणार नाही, गजर लावतोस का?
उठवशील का मला? आणि चहा देशील करून?’, तिनं विचारलं…
'देतो की…’, गजर लावत लावत मी म्हणालो
मग उद्याची सकाळ अस्तित्वात नसल्याच्या आविर्भावात
आहे तो क्षण कुशीत घेऊन, आम्ही गाढ झोपून गेलो
स्पप्नांच्या गावातच असताना
जोरात वाजणाऱ्या गजरानं
मला अर्धवट जाग आली
'तिला जायचंच, उठवायला हवं’
मनाशी म्हणून तिला उठवलं
गाढ झोपेत असलेली ती
'जायलाच हवं’ या अनिवार्यतेतून उठलीही
‘चहा करायला नाही जमायचं, करून घेशील का तू?’
असं तिला म्हणून, तिच्या उत्तराची वाट न बघता
मी पुन्हा झोपून गेलो
कितीतरी वेळानं मला जाग आली
शेजारी ती नव्हती
घरात तिचा पत्ता नाही
आणि स्वैपाकघरातल्या ओट्यावर
झाकून ठेवलेला होता
माझ्यासाठी एक चहाचा कप….
आणि होती एक चिठ्ठी
‘तसाच पिऊ नकोस, गरम करून पी… Love you!’
च्यायला, हे बायकांसरखं प्रेम करणं
जमतंच नाही राव आपल्याला…