गरज

प्रसाद शिरगांवकर

"नको ना गं जाऊस मला सोडून",

अस्ताव्यस्त खोलीतल्या विस्कटलेल्या बेडवर अस्ताव्यस्त पसरलेला तो तिला आर्जवं करत होता.

आरशासमोर उभं राहून नुकत्याच नेसलेल्या साडीच्या पदराच्या घड्या चापून चोपून बसवल्यावर पदराला पिन लावता लावता ती कोरडेपणानी म्हणली,

"मला जावं लागेल. अन ते आपल्या दोघांनाही माहित आहे"

"पण का? आणि अशी इतक्या लगेच अनोळखी, कोरडी कशी होऊ शकतेस तू"

"मला वाद घालायला वेळ नाहीये. सहा वाजत आलेत. अनीशला ग्राउंडवरून पिकअप करायची वेळ झालीये."

"थोडा वेळ थांब की गं अजून... आज खूप छान मूड आहे... एकदाच... अजूनच एकदाच जवळ ये ना फक्त... फक्त आजच्या दिवस..."

"लहान मुलासारखा हट्ट करू नकोस... मला उशीर होईल... घरी जाऊन सगळा स्वैपाक करायचा आहे संतोष घरी यायच्या आत..."

"खड्ड्यात गेला तुझा नवरा... तुझा नवरा, तुझा मुलगा... तुझा संसार... सगळं तुझं तुझं... मी कोणीच नाहीये का तुझ्यासाठी..."

तिनं आरशात बघणं बंद करून वळली. त्याच्याकडे एक थंड लुक देऊन म्हणाली,

"आपलं डील विसरलास? 'आपण एकमेकांचे कोण' हा प्रश्न कधीच एकमेकांना विचारायचा नाही असं ठरलं होतं आपलं. एकमेकांबरोबरच्या संसाराची स्वप्नंही कधीच पहायची नाहीत असंही ठरलं होतं आपलं. आपण एकमेकांची गरज आहोत. आणि हे बघ, पुन्हा हा प्रश्न विचारणार असशील तर मी उद्या दुपारी येणार नाही."

"नसेल यायचं तर नको येऊस... खड्ड्यात जा..."

तिनं घड्याळ बघितलं. काहीच न बोलता बेडरुममधून बाहेर पडली. चपला घालून दार उघडून निघून गेली.

तो बराच वेळ तसाच अस्ताव्यत पडून राहिला. मग सावकाश उठून बाथरुममध्ये गेला. गार पाण्याच्या शॉवरखाली बराच वेळ उभा राहिला. मग स्वच्छ आवरून त्याच्या लिखाणाच्या खोलीत येऊन बसला. लॅपटॉप उघडला आणि त्याची लेटेस्ट कादंबरी, काल जिथे अर्धवट सोडली होती तिथून पुढे लिहायला लागला.

ती ग्राउंडवर गेली. मुलाला पिकअप केलं. घरी गेली. स्वैपाक केला. मुलाला वाढलं. स्वतः जेवली. नवऱ्याचं ताट वाढून झाकून ठेवलं. TV बघितला. फेसबुक बघितलं. व्हॉट्सअॅप बघितलं. मुलाचा होमवर्क करून घेतला. मुलाला झोपवलं. पुन्हा फेसबुक बघितलं. व्हॉट्सअॅप बघितलं. आणि नवऱ्याची घरी यायची वाट न बघता झोपून गेली.

तो पहाटे सहा पर्यंत लिहित बसला.

ती पहाटे सहा पर्यंत गाढ झोपून गेली. गजर झाल्यावर उठली. शेजारी झोपलेल्या नवऱ्याकडे न बघताच मुलाच्या खोलीत जाऊन त्याला उठवलं. त्याचा डबा केला. त्याला आवरून शाळेत पाठवलं. नवऱ्यासाठी चहा ब्रेकफास्ट करून ठेवला. स्वतः चहा पिऊन मॉर्निंग वॉकला निघून गेली.

सहाच्या सुमारास त्याला कादंबरीतली पात्रं पुढे काय करतायत हे काहीच सुचेनासं झालं तेंव्हा तो लिखाणाच्या खोलीतून उठला. फ्रिजमध्ये ठेवलेला दुधाची अर्धवट संपलेली पिशवी तशीच तोंडाला लावून संपवली. शेजारीच ठेवलेली अर्धी संपलेली पेस्ट्री एका घासात खाऊन टाकली. कादंबरीची नायिका पुढे नक्की काय करेल याचा विचार करत करत अस्ताव्यस्त पसरलेल्या बेडरुममधल्या विस्कटलेल्या बेडवर लोळत पडला. कधी झोप लागली त्याला कळलं नाही.

ती मॉर्निंग वॉकहून परत आली तेंव्हा नवरा चकाचक आवरून, सोफ्यावर बसून शूज घालत होता. मोबाईलवर घणाघणा बोलणं सुरूच होतं. तिच्याकडे फॉर्मल हसून बघून त्यानं मोबाईलवरचं बोलणं सुरूच ठेवलं. बोलता बोलताच घरातून निघाला. जाता जाता एक मिनिट मोबाईल कानापासून दूर करून तिला, "उशीर होईल, थांबू नकोस" एवढंच म्हणाला. दार ओढून निघून गेला.

तिनं स्वतः निवांत ब्रेकफास्ट केला. पुन्हा एकदा चहा केला. चहा पित पित पेपर वाचला. मग निवांतपणे स्वतःचं आवरलं. स्वैपाक केला. TV बघितला. जरावेळ काहीबाही वाचत बसली. मुलगा शाळेतून घरी आला. त्याला जेवायला वाढलं. स्वतः जेवली. तासभर डुलकी काढली.

तो गाढ झोपेतून तीन का चारला कधीतरी उठला. कालचा प्रसंग आठवला. ती आज येईल का नाही या विचारानं कासावीस झाला. समोरच्या टपरीवर फोन करून चहा नाष्टा पाठवायला सांगितला. जमेल तेवढं स्वतःचं आवरून उगाच सोफ्यावर बसून प्रकाशकांना वगैरे निरर्थक फोन करत राहिला.

बेल वाजली. दार उघडलं. टपरीवरचा पोऱ्या चहा नाष्टा पार्सल घेऊन आला होता. ठेवून गेला.

बेल वाजली. दार उघडलं. समोर ती. रोजच्यासारखीच. आज अस्मानी रंगाची साडी नेसली होती. केस मोकळे सोडले होते. अफलातून दिसत होती. घरात आली. अन काल काहीच न झाल्यासारखं म्हणाली,

"हायssss"

"हाय"

"अरे वा, आज छान आवरून वगैरे बसलायस... मला वाटलं बेल वाजली की उठशील..."

"नाही, मगाशीच जाग आली..."

"किती वेळ लिहित बसला होतास काल?"

"Dunno.... सकाळी कधीतरी झोपलो..."

"ए सांग ना... काय लिहिलंस काल? काय झालं पुढे...? काय ठरवलं आपल्या हिरॉईननी?"

तो क्षणभर थांबला. डोळे मिटून बसला. ती त्याच्या शेजारी येऊन बसली. तो डोळे बंद ठेवूनच काल रात्री लिहिलेला त्याच्या कादंबरीचा भाग सांगायला लागला... ती हळूच त्याच्या मांडीवर डोकं टेकून डोळे मिटून त्याची गोष्ट ऐकत पडली... तो तिच्या केसांमधून हळुवारपणे हात फिरवायला लागला.... कधीतरी तो बोलायचा थांबला...

ती तशीच डोळे मिटून पडून होती... तिनं विचारलं, "पुढे काय झालं?"

"माहित नाही...."

तो जशी घडेल तशी कादंबरी लिहित होता... त्या कथेचा शेवट त्यालाही माहित नव्हता... आणि तिलाही...

Average: 6.7 (3 votes)