पेटली जी काल होती आज का ती थंड ज्वाला?
सूर ओठांतील राणि का असा निस्तेज झाला?
बेगड्या त्या मौत्तिकांचा हट्ट दे सोडून आता
ओवुनी मी आसवांना गुंफली ही मुग्ध माला
हिंडलो दाही दिशांना घेउनी चिंध्या सुखांच्या
त्याच चिंध्या आज आल्या प्रेत माझे झाकण्याला
कोण मी अन कोण तू हे आपले नाते कशाचे
उत्तरे नाहीत ज्यांची प्रश्न ते यावे कशाला!
कालचा पाउस माझ्या अंगणी आलाच नाही
आज ये तू, आज ये तू, सांगतो मी पावसाला!