शुक्रवार संध्याकाळ. सानिका आपल्या बावीसाव्या मजल्यावरच्या आलीशान अपार्टमेंटमध्ये कुलूप उघडून येते. एकटीच. जरा घाईतच असते. डिझायनर चपला घाईत काढून फेकते. खांद्यावरची स्टायलीश पर्स हॉलमधल्या सोफ्यावर फेकून देते. घड्याळात बघते, पावणे सहा वाजलेले असतात.
“नऊचा मूव्ही आहे. आहे भरपूर वेळ. ” तिचं एक मन म्हणतं. पण तिच्या दुसऱ्या मनाला हे काही पटत नाही. ती घाईनं बेडरुममध्ये जाते. वॉर्डरोब उघडून साड्या, ड्रेसेस आणि पार्टीवेअरच्या नीट लावून ठेवलेल्या घड्या धसमुसळेपणानं उलट्या-सुलट्या करायला लागते.
“नेव्ही ब्लू. येस. नेव्ही ब्लूच. त्याला आवडतो हा रंग. खूप आवडतो. तो इव्हिनिंग गाऊन कुठे गेला? ह्या. हवं तेंव्हा काहीच सापडत नाही मला."
तिची चिडचिड आणि वैताग होतो. पण सापडतो तिला तो गाऊन. कोपऱ्यात कुठेतरी असतो. ती तो गाऊन कपाटातून काढते. जरासा जुनसर दिसत असतो. थोडा चुरगाळलेलाही असतो. हातानीच तो ठीक-ठाक करायचा प्रयत्न करते. मग तो गाऊन आपल्या अंगासमोर धरून आरशात बघते. "काय अफलातून दिसायचो या गाऊन मध्ये आपण. ”. त्यानं तिला प्रपोज केलं तेंव्हा तिनं हाच गाऊन घातला होता हे तिला आठवतं. तेंव्हाची ती आठवते. तेंव्हाचा तो आठवतो. सानिका लाजते. मोहरते. घड्याळात बघते. साडे सहा!
झटका बसल्यासारखी तिथून उठते. बाथरूम मध्ये जाते. थंडगार पाण्याचा शॉवर अंगावर घेते. पटापट आवरायला लागते. तो निळा गाऊन, त्यावरच्या मॅचिंग अॅक्सेसरीज. त्याला साजेसा हलकासा मेकअप वगैरे. हेअर ड्रायरनी केस वाळवत केसांना जरा स्टाईल वगैरे देते. घड्याळात बघते. सात दहा!
“आहे, अजूनही वेळ आहे. तो आठ वाजता येतो असं म्हणाला आहे. पाऊण तास आधी मी आवरून तयार आहे!” स्वतःवर खुष होते.
जरा निवांतपणे किचनमध्ये जाते. फ्रीज उघडून दूधाचं पातेलं बाहेर काढते. गॅसवर ठेवते. एका मोठ्या मगमध्ये नेसकॉफी टाकते आणि त्यात थोडं पाणी टाकून चमच्यानी घोटायला लागते. दूध तापल्यावर मगमध्ये दूध ओतून फक्कड कॉफी तयार करून तिचा एक सिप घेते.
“डिव्हाईन!!” डोळे मिटून दोन क्षण तशीच उभी रहाते.
हॉलमधे येते. सोफ्यावर पडलेल्या पर्समधला मोबाईल काढते. सोफ्यावर निवांत बसते. मोबाईल अनलॉक करून बघते तर १४ मिस्ड कॉल्स!
“एवढं कोण पेटलंय या वेळी?” म्हणत मिस्ड कॉल्स लिस्ट उघडते. चाैदाच्या चाैदा कॉल्स त्याचे असतात. ती त्याला फोन लावायला लागते. लागत नाही.
मोबाईलच्या घड्याळात सात पस्तीस झालेले दिसतात.
ती अस्वस्थ व्हायला लागते. ती पुन्हा पुन्हा फोन करत रहाते. फोन लागतच नसतो.
ती वैतागते. फोन सोफ्यावर फेकून देते. कॉफीचा मग समोरच्या कॉफी टेबलवर गार होत पडून रहातो. ती TV चालू करते.
हल्ली रोज रात्री त्याला घरी यायला उशीर होतो तेंव्हा ती हेच करते. उगाचच TV बघत बसते. कुठेतरी काहीतरी सुरू असलेले डेली सोप्स किंवा खोटे रियालिटी शोज ती निर्विकार मनानं बघत रहाते.
जे रोज ती करते, तेच ती आजही करायला लागली.
त्यांच्या सहजीवनातही असलेलं तिचं एकटेपण ती TV मध्ये बुडवून टाकायला लागली.
चॅनल बदलताना तिला TV वरच्या घड्याळात आठ वाजलेले दिसले.
सानिकानी सोफ्यावरचा फोन उचलला. यांत्रिकतेनं त्याला पुन्हा फोन लावला. आता फोन लागला. त्यानं उचलला.
ती काही बोलायच्या आधीच, अत्यंत चिडक्या आवाजात तो म्हणाला,
तो: कुठे आहेस? गेला तासभर फोन करतोय तुला
ती: अरे मी...
तो: फोन घ्यायचा नसतो तर ठेवतेस कशाला मोबाईल जवळ
ती: मी जरा
तो: Look, don't give me excuses
ती: घरी आहे. तुझी वाट बघतीये.
तो: I can't make it today
ती: But you had promised me
तो: No. मी म्हणालो होतो try करीन म्हणून. But there's a pressing deadline I cannot avoid it.
ती: "___"
तो आता समजावणीच्या सुरात येतो
तो: Look honey, it's just bad timing for me. I mean, I have to be at the office. I had promised because you insisted on it.
सानिकाला हुंदका फुटतो. ती तो लपवायचा प्रयत्न करत म्हणते.
ती: तू असा नव्हतास. किती मस्त मजा करायचो आपण. अगदी वीक डे मध्येही दुपारी अॉफीसला दांडी मारून तू घरी यायचास. आता तू शुक्रवारी रात्री नऊ वाजताही येत नाहीस.
तो: It's not that sweetheart. Nothing to do with you or us. It's just that I have severe pressures at my workplace.
ती: आणि घरी असतोस तेंव्हा तरी काय रे सतत तुझा लॅपटॉप, iPad किंवा मोबाईल चालू असतो.
तो: "___"
ती: गेल्या वर्षाभरात आपण एक दहा मिनिटं तरी एकमेकांशी नीट बोललो आहोत का?
तो: Now, don't you make me a villain. चार वर्षांपूर्वी आपण छोट्याशा rental flat मध्ये रहायचो आणि माझ्या बाईक वर आनंदात हिंडत लक्ष्मीरोडवर शॉपिंग करायचो. आत्ताचं Luxury Apartment, SUV Car आणि Designer Accessories वापरायचं स्वप्न माझं एकट्याचं नव्हतं. दोघांचंही होतं ना?
ती: "___"
तो: Will you be happy to go back to that old mediocre life?
ती: पण मला नव्हतं वाटलं की "हे" आयुष्य मिळवण्यासाठी, "ते" आयुष्य सोडून द्यावं लागेल.
तो: You gain some, you lose some honey. Anyways, got to go. I will be very very late. उद्या सकाळीच भेटुया Love you sweetheart.
ती: (निर्विकारपणे). Love you too. Bye.
सानिका फोन ठेवते. सुन्न बसून रहाते. नकळतच कॉफीचा मग उचलून एक घोट घेते. थंड झालेल्या कॉफीच्या घोटानं तोंडाची चव जाते, चेहरा कसानुसा होतो. किचनमध्ये जाऊन कॉफी मायक्रोवेव्ह मध्ये गरम करते. मग घेऊन हॉलमध्ये येते. TV un-mute करणार इतक्यात मोबाईलची नोटीफिकेशन्स वाजतात.
सानिका मोबाईल उचलते. त्यावर फेसबुक आणि व्हॉट्सअॅपची शेकडो नोटिफिकेशन्स दिसतात.
सानिका ती नोटिफिकेशन्स बघायला लागते त्या अपडेट्समध्ये रमायला लागते. आपल्या आयुष्यात जे खरंखरं चाललंय ते विसरायला लागते.
अन आपली भरजरी पण एकाकी अशी शुक्रवारची संध्याकाळ सानिका सोशल मीडियात बुडवून टाकायला लागते.