रुचकर दिवाळी

प्रसाद शिरगांवकर

आई गरमा गरम चकल्या तळत असताना
तिचं लक्ष नाहिये असं बघून
दोन चार चकल्या लंपास करणं

कढईत भाजत असलेल्या
बेसनाच्या घमघमाटानं अस्वस्थ होऊन
वळले जायच्या आधीच
वाटीमध्ये घेऊन ‘लाडू’ फस्त करणं

आईनी कष्टानी केलेल्या फराळाचं ताट
शेजाऱ्यांकडे मोठ्या दु:खानी घेऊन जाणं
त्या बदल्यात त्यांनी दिलेल्या ताटातल्या पदार्थांची
आईसमोर समीक्षा आणि चिरफाड करणं!

तयार केला जात असताना
प्रत्येक पदार्थ हाणून झालेला असतानाही
दिवाळीच्या पहिल्या पहाटेला
शेव, चिवडा, चकल्या, कडबोळी, लाडू, अनारशांनी भरलेलं ताट
कुतुहलानं समोर घेऊन
त्या ताटातला प्रत्येक पदार्थ
आपण पहिल्यांदाच चाखत आहोत
असं मनोमन वाटून त्याची मजा घेणं

आणि दिवाळीच्या पुढच्या आठवड्यात
उरलेल्या, सादळलेल्या चिवड्याचेही बकाणे भरणं
किंवा त्यात तर्री घालून त्याची मिसळ करुन हाणणं…

मी खूप खूप प्रयत्न करतो
पण मारवाड्याकडे मिळणाऱ्या तयार पाकिटांमधल्या
किंवा
आॅर्डर देऊन घरी येणाऱ्या डब्यांमधल्या
फराळाच्या पदार्थांमधून
यातला कुठलाच अनुभव येत नाही

आईचे, बायकोचे आणि आपलेही कष्ट
Outsource तर केले आपाण
पण
हरवून बसलो
आपल्या हातानी अापली दिवाळी
आपणच रुचकर करण्यातला आनंद….

Average: 5 (2 votes)