मालक, मुकादम आणि मजूर!

प्रसाद शिरगांवकर

कारखाना म्हणा, बांधकाम म्हणा किंवा सॉफ्टवेअर कंपनी
कोणत्याही कामाच्या ठिकाणी
काम करणाऱ्या माणसांचे प्रकार तीनच
मालक, मुकादम आणि मजूर!

प्रत्यक्ष निर्मितीचं काम करणारे ते मजूर
त्यंाच्याकडून काम करू घेणारे मुकादम
आणि मुकादमांचे लगाम सांभाळणारे ते मालक!

मजूरांचं आयुष्य कष्टमय, पण सोपं!
आठ तास काम, केलेल्या कामाची मजुरी
अन ती ही वेळच्यावेळी येणार

मुकादमांचं आयुष्य कष्टमय, आणि क्लिष्टही…
दहा-बारा तास काम, मजुरी तशी जास्त
पण ती ठरणार
मजुरांकडून करून काम करून घ्यायच्या क्षमतेवर
आणि मजूरांनी प्रत्यक्ष केलेल्या कामवर

मालकांचं आयुष्य तसं कठीणच
काम किती, कोणतं, कधी, कसं करावं लागेल याचाही भरोसा नाही
अन पैसे किती मिळतील, कधी मिळतील, येतील का डुबतील, याचाही भरोसा नाही!

तरीही
मजुराला वाटतं मुकादम व्हावं
मुकादमाला वाटतं मालक व्हावं
अन मालकाला वाटतं,
‘कुठून सुचली ही अवदसा मालक होण्याची’

मग करावं काय आपण? बनावं कोण?

स्वतःच्या हातांनी निर्मिती करायला आवडत असेल,
ठराविक काम अन त्याचा ठराविक मोबदला यात समाधान असेल
तर मजूर व्हावं

इतरांकडून निर्मिती करून घ्यायला जमत असेल,
मजूरांकडून करून घेतलेल्या कामाबद्दलचा,
मालकानं दिलेला मोबदला मान्य असेल
तर मुकादम व्हावं

हे दोन्हीही जर जमत असेल
अन खूप पैसे मिळवायची इच्छा असेल
अन डुबले तरी चालण्याची तयारी असेल
तर आणि तरच मालक बनावं!!

[आणि यातलं काहीच जमत नसेल
तर फेसबुकवर कविता लिहाव्यात
‘कसं जगावं’, हे इतरांना सांगणाऱ्या!]

Average: 6.1 (9 votes)