आपल्याला आवडत असलेलं काम करण्यासाठी

प्रसाद शिरगांवकर

आपल्याला आवडत असलेलं काम करण्यासाठी
आपल्या सर्व गरजा भागवण्या इतका मोबदला
आपल्यातल्या प्रत्येकालाच, आयुष्यभर मिळत राहिला
तर या पृथ्वीचा स्वर्ग होईल!
निदान आपल्यातल्या प्रत्येका पुरता....

पण गंमत अशी आहे,
आपल्याला नेमकं काय करायला आवडतं
हेही आपल्याला कळत नाही
आणि आपल्या खऱ्याखुऱ्या गरजा कोणत्या
आणि किती आहेत हेही...

मग न कधीच समजलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी
धावत रहातो, झटत रहातो आपण
कधीच न आवडणारं काम करत,
आयुष्यभर....

अन मधुनच स्वतःला विचारत रहातो
'ह्या, काही मजा नाही राव आयुष्यात,
काय चुकतंय नेमकं?'

Average: 8.6 (32 votes)