मागच्या पानावरून पुढे सुरु!

प्रसाद शिरगांवकर

उलटून गेली पानं जी जी
हिशेब त्यांचा कशाला करू
आयुष्य माझं, आहे कधीचं
मागच्या पानावरून पुढे सुरु!

तेच मायने, तेच रकाने
त्याच त्या शब्दांमधे बरबटलेली पाने
आशय नसलेल्या आठवणींच्या पोथ्या
घट्ट उराशी कशाला धरू?
आयुष्य माझं, आहे कधीचं
मागच्या पानावरून पुढे सुरु!

त्याच बेरजा, त्याच वजाबाक्या
सगळ्याच स्वप्नांचा हा गणिती खाक्या
कसले भागाकार, कसले गुणाकार
अन कसले हातचे मनात धरू
आयुष्य माझं, आहे कधीचं
मागच्या पानावरून पुढे सुरु!

कधी भरती, कधी ओहोटी
सुखाची आशाच कधी वांझोटी
भटकी गलबत, फाटकी शिडं
सुटले किनारे..... कुठले स्मरू?
आयुष्य माझं, आहे कधीचं
मागच्या पानावरून पुढे सुरु!

नजरा उपाशी, श्वास अधाशी
भुकेलीच निजलेली स्वप्नं सारी उशाशी
नव्या उषेच्या नव्या गीतांमधे
प्राण माझे मी कशाला भरू?
आयुष्य माझं, आहे कधीचं
मागच्या पानावरून पुढे सुरु!

Average: 8.4 (17 votes)