पंधरा ऑगस्टला ईमेल्स बघण्याची
कुठून कळेना बुध्दी झाली...
माझ्या इनबॉक्स मधे आज
बापुजींची ईमेल आली!
sender चं नाव ओळखीचं नव्हतं
वाटलं, कदाचित spam असेल...
नंतर वाटलं, बापुजींच्या नावानी
कशाला कोण spamming करेल!
बापुजींनी लिहिलं होतं...
बेटा, साठ वर्षातली तुमची प्रगती पाहून
मला फार फार आनंद झालाय...
आत्ताच मी पाहिलं,
ऑर्कुटवरच्या हजारो प्रोफाईलस वर
आज माझा तिरंगा झळकलाय!
तुमचं अपार देशप्रेम पाहून
ऊर माझा दाटून येतो...
पंधरा ऑगस्टला SMS च्या पुरात
देश सगळा बुडून जातो!
तुझ्याही इनबॉक्स मध्ये आज
शेकडो forwards आली असतील
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणारी
e-greetings सुध्दा भरपूर असतील...
तुझे SMS, emails, scrapping झाल्यावर
माझं एक छोटंसं काम करशील?
एक चरख्याचं चित्र मी attach केलंय
तेही तुझ्या मित्रांना forward करशील... ?
आणि हो...
तुझ्या १० मित्रांना १० मिनिटात हे forward केलं नाहीस
तरी फरक काहीच पडणार नाही....
कारण चरख्यावाचून या देशाचं
आता कधीच काही अडणार नाही...
आणि बापुजींवाचूनही तुमच्या कोणाचं
आता कधीच काही अडणार नाही...
प्रसाद शिरगांवकर...