मालकीहक्क

प्रसाद शिरगांवकर

आजही शांत झोपले होते
नेहमीसारखीच...
मिटल्या डोळ्यांनी चाखत होते
माझी साखर पहाट...

आणि आजही तू आलास
मालकीहक्कानं मला गदागद हलवून
माझी प्राजक्तफुलं
तुझ्या पदरात पाडून घेतलीस...

तुझा उन्मेष संपल्यावर
पाहिलंही नाहीस ढुंकुन...
तसाच पाठ फिरवून निजुन गेलास

मग मी गोळा करत बसले
माझ्या फुटक्या पहाटेचे
रक्ताळलेले तुकडे
एक एक तुकडा बोचत होता जीवापाड
पण हुंदकाही देता येत नव्हता
भीती होती...
तुला परत जाग आली तर....

Average: 8.6 (35 votes)