चंद्रास मावळू दे...

प्रसाद शिरगांवकर

माझ्या तुझ्या सुरांच नातं असं जुळू दे
नात्यात आपल्या गं मल्हार कोसळू दे

आलीस घेउनी तू तारांगणे सुखाची
जातेस का? जरा या चंद्रास मावळू दे

मकरंद चाखणा या फुलपाखराप्रमाणे
ओठांस आज माझ्या संजीवनी मिळू दे

नेसून ये सखे तू आकाश तारकांचे
एका मिठीत सारे आभाळ आवळू दे

देहांत तापलेल्या बरसून जा अशी तू
दाही दिशांस माझा मृद्गंध दरवळू दे

Average: 8.7 (19 votes)