हासरा जो काल होता आज चिंताग्रस्त आहे
चेहरा पाहून माझा आरसाही त्रस्त आहे
झेलण्या तूफान सारे काल होतो एकटा मी
आज माझ्या सोबतीला आसवांची गस्त आहे
का उभ्या आहेत भिंती काटक्यांनी बांधलेल्या?
पत्थरांनी बांधलेला कोट का उध्वस्त आहे?
बोचणारे सर्व ओझे घेतले पाठीवरी मी
क्रूस माझे वाहणारा भाबडा मी ख़िस्त आहे
स्पंद माझे काल त्यांना वाटले मी का कळेना
राहिलेल्या स्पंदनांवर आज माझी भिस्त आहे