चांदणे सांभाळ तू

प्रसाद शिरगांवकर

पोळलो आगीत ज्या, झेलू नको तो जाळ तू
ज्या चुका मी काल केल्या त्या चुकांना टाळ तू

देत आहे मी तुला माझीच ही कादंबरी
ह्या चुकांच्या पुस्तकाची रोज पाने चाळ तू

पत्थरांना या सरी देतोच तू आहेस का?
अंतरीच्या पावसा आता जरासा वाळ तू

ठेवते आहेस का हे केस राणी कोरडे
मोकळ्या केसांत तुझिया सूर माझे माळ तू

सांग तू आता मला मी आज कोठे शिंपडू
आज जे शिंपेन मी ते चांदणे सांभाळ तू

Average: 8.2 (6 votes)