याद येते...

प्रसाद शिरगांवकर

तुझी ती तान आता याद येते
अदा बेभान आता याद येते

तुला पाहून होते संपले जे
हरवले भान आता याद येते

तुझ्या शोधात गेलो मी जिथे ती
दिशा सुनसान आता याद येते

समुद्रापार झाली नाव माझी
तुझे तूफान आता याद येते

किती झेलू दिशांचे शाप मीही
तुझे वरदान आता याद येते

रिता प्राजक्त माझ्या अंगणीचा
फुलांचे गान आता याद येते

Average: 8.7 (133 votes)