दहाव्या मजल्यावरचं
दहा बाय वीसचं माझं छोटंसं टेरेस
ओपन टू स्काय वगैरे
त्यात आम्ही हाैसेनं फुलवलेली
छोटीशी बाग
गुलाब, मोगरा, जाई, प्राजक्तापासून
शेवंती, झेंडू, सदाफुली आणि चाफाही!
या बागेत रोज येतात
चिमण्या कावळे कबुतरं साळुंक्या
अगदी क्वचित एखादी घार आणि पोपटही!
याच टेरेसमधे मी दिवाळीला लावतो
लखलखणारा आकाशकंदील
आणि मग रात्रीही यायला लागतात पर्यटक!
भरपूर वेगवेगळे किडे,
मला नावंही माहीत नसलेले!
घिरट्या घालत बसतात आकाशकंदिलाभोवती
किंवा चिकटून बसतात त्याच्या झिरमिळ्यांना
मग त्यांना खाण्यासाठी येतात
दोनचार गलेलठ्ठ पण चपळ पाली
आणि हे सगळे रात्रभर खेळत बसतात
लपाछपी, शिवाशिवी, पकडापकडी वगैरे
माझ्याच टेरेसच्या भिंतींवर
सकाळी बघतो तेंव्हा
झेंडू, शेवंती बहरलेले असतात
प्राजक्ताच्या कुंडीभोवती
स्वर्गीय सडा पडलेला असतो
एखादा गुलाब, जास्वंद
एेन तारुण्यात झळकत असतो
आणि कबुतरं, कावळे
अन्न शोघत फिरत असतात
झाडांभोवती, आकाशकंदिलाखाली वगैरे
मग
या दहा बाय वीसच्या सृष्टीचा
ब्रम्हा, विष्णू आणि महेश
असल्याच्या आविर्भावात
मी झाडांना पाणी घालतो
कबुतर चिमण्यांना दाणे घालतो
आकाशकंदील साफ करून ठेवतो
आणि मग
कावळे चिमण्यांपासून किडे पालींपर्यंत
कोणीच माझ्या घरात शिरू नये म्हणून
टेरेसचं दार मात्र घट्ट बंद करून घेतो!