आजही पोहे सॉलिड टेस्टी झाले होते!

प्रसाद शिरगांवकर

माझ्या सासर आणि माहेरच्या बहुसंख्य लोकांपेक्षा
जास्त शिकलेली, जास्त कमावणारी माझी बायको

तिलाही दरवेळी ताण येतो
माझ्या माहेरची लोकं
जेवायला येणार असतात तेंव्हा!

आज तर साधे पोहेच करायचे होते
तेही फक्त नाष्ट्याला
तरी पहाटे सहाचा गजर लावून उठली
आणि जीव ओतून काम करायला लागली!

काय म्हणावं याला?
पुरुष-प्रधान संस्कृतीचा पगडा?
तिचा पर्फेक्शनिझम?
का तिचं नात्यांवरचं निव्वळ प्रेम?

उत्तर मला माहित नाही
तिलाही नेहमी विचारतो,
तीही काही सांगू शकत नाही

काहीही असो,
पण आजही पोहे सॉलिड टेस्टी झाले होेते!!

Average: 9.3 (38 votes)