तिच्यासाठी कधीच येणार नाही

प्रसाद शिरगांवकर

"मॉमला ऍडमिट केलंय डॅड, येऊ शकशील का?"

"का? काय झालं आता? लीव्हर का परत?"

"___"

"लाखदा सांगितलं होतं तिला, एवढं पिऊ नको म्हणून"

"तू सोडून गेलास म्हणूनच प्यायला लागली होती ना?"

"डोन्ट यू ब्लेम मी नाऊ. बारा वर्षं झाली मी सोडून जाऊन. आयुष्यभर ती मलाच ब्लेम करत रहाणार आहे का?"

"डॅड प्लीज स्टॉप इट. तू येऊ शकशील का?"

"हॉस्पिटलला बिलं माझ्या नावावर पाठवायला सांग. सेटल होतील"

"इट्स नॉट अबाऊट मनी डॅम इट. ती घरात कोसळल्यापासून तुझं नाव घेतीये. आत्ता बेशुद्ध असतानाही फक्त तुझंच नाव घेतीये."

"हं, माझं नाव घेतीये! आता खूप उशीर झालाय असं नाही का वाटत?"

"तिला शेवटचं 'सॉरी' म्हणायची संधी पण देणार नाहीयेस का?"

"तुला माहित नाही तिनी काय केलंय ते"

"माहित आहे. मला सांगितलं तिनी."

"___"

"मला माहित आहे की तू माझा खरा डॅड नाहीयेस. मला हेही माहित आहे की तिच्या अफेअर बद्दल तुला कळलं म्हणून तू तिला आणि मलाही सोडून गेलास. लांब राहूनही तू सतत माझी काळजी घेतलीस. ह्याचं तिला फार गिल्ट आहे डॅड. तिला तुला सॉरी म्हणायचं आहे. एकदाच, शेवटचं, येशील का रे प्लीज?"

"तिच्यासाठी कधीच येणार नाही. पण तुझ्यासाठी येतो."

Average: 9.5 (2 votes)