सिक्युरिटी

प्रसाद शिरगांवकर

-------------
सकाळी ९.००
--------------

रेवा
"साला कुत्रा हरामी लोचट" त्या सिक्युरिटी वाल्याला मनातल्या मनात सणसणीत शिव्या हासडून रेवा कंपनीत शिरली. रोजच्यासारखीच. तशी ती नवीनच होती या कंपनीत. दोनेक महिनेच झाले असतील जॉईन होऊन. पण अजून पर्मनंट नसल्यानं रोज सिक्युरिटी केबिन मध्ये जाऊन पास घ्यावा लागायचा तिला. आणि रोज तोच तो सिक्युरिटीवाला तेच ते प्रश्न विचारायचा पास द्यायच्या आधी. ते प्रश्न ठीक होते. नाव-गाव-पत्ता टाईप. पण ते विचारतानाचा त्याचा टोन. आणि मुख्य म्हणजे त्याची ती लुब्री नजर. आरपार भेदून जायची रेवाला. अक्षरश: कपडे भेदून आत शिरायची. आपण नागडे आहोत असं वाटायचं रेवाला रोज कंपनीत शिरताना.

गगन
"क्या आयटम है यार ये रेवा। खवा है खवा। दिल खुष हो जाता है रोज सुबै। एक चान्स तो मिलना चाहिये यार इसके साथ, जिंदगी बन जाएगी" गगन रोजच्यासारखाच आजही रेवाला बघून अस्वस्थ झाला होता. दूर कुठेतरी उत्तरप्रदेशातल्या गावचा. पुण्यात सिक्युरिटीच्या नोकरीला. बारा तासाची ड्युटी. कधी दिवसा, कधी रात्री, कधी डबल ड्युटी. जवळच्याच एका छोट्या फ्लॅटमध्ये सहा सिक्युरिटी गार्ड्सची रहायची सोय, त्यात तो एक. जेवणखाण, कपडे आणि रहायची जागा सगळं मुकादम देणार. चारच महिन्यांपूर्वी गावाकडे जाऊन लग्न करून आला. जेमतेम आठवड्याची सुट्टी. दोन दिवस लग्न समारंभ. दोन दिवस पूजा देवदर्शन वगैरे. जेमतेम दोनेक रात्री निवांत मिळाल्या होत्या स्वतःच्या नव्या नवरी सोबत. कामावर परत यावं लागलं. नवरीला गावीच ठेवलं होतं. त्या दोन रात्रींतले तिचे स्पर्श आठवत दिवस पुढे ढकलत होता.

त्यात ही रेवा एकदा समोर आली. जीव कासावीस झाला त्याचा. अन पास काढायच्या निमित्तानं ती रोज रोज केबिनमध्ये येऊन बोलायला लागली गगनशी.

गगनच्या desperation चा कडेलोट होत चालला होता.

------------
दुपारी ४.००
------------

रेवा
रेवा कॅन्टीनला कॉफी प्यायला आली. एकटीच. कॉफी घेत विचार करत बसली.

"त्या सिक्युरिटीवाल्याची नजर फारच घाणेरडी आहे. काय नाव त्याचं, गगन का काहीतरी. शीssss कधीच इतकी घाण नजर नाही बघितली मी. कंप्लेंट करायची का त्याची? पण कुठे कंप्लेंट करणार? आणि काय सांगणार त्यांना? प्रूफ काय आहे माझ्याकडे याचं?" फोन वाजला, रेवाची विचारांची लिंक तुटली. राघवचा, तिच्या टीम लीडरचा फोन होता. काहीतरी खूप अर्जंट काम होतं. हातातली कॉफी अर्धवट ठेवून ती तिच्या क्युबिकलमध्ये परत गेली.

गगन
मनातल्या मनात, "आजकल रेवा को बहोत लेट हो रहा है। आज मै भी डबल ड्युटी करता हुं।"

------------
रात्री ११
------------

रेवा
"ओ शिट. कधी पूर्ण होणार आहे हे सगळं काम?" रेवा वैतागली होती. तिनी केलेल्या कामात प्रचंड चुका झाल्या होत्या. त्या सोडवत बसली बसली होती. प्रोजेक्टची डिलीव्हरी जवळ आली होती आणि तिचं काम आजच पूर्ण होणं गरजेचं होतं. बाकीचे टीम मेंबर्स निघून गेले होते. आख्या मजल्यावर ती आणि तिनं केलेलं काम तपासायला पलिकडच्या क्युबिकल मध्ये बसलेला तिचा टीम लीडर राघव असे दोघंच राहिले होते.

"Just last one bug Reva, then you may leave", राघव तिच्या मागे येऊन म्हणाला.

तिनी घड्याळाकडे बघितलं.

"Oh, I didn't realize. It's petty late. Just call the security, they will call a cab. And claim your expenses." तो पुन्हा त्याच्या क्युबिकलमध्ये निघून गेला.

रेवानी सिक्युरिटी केबीनला फोन लावला. पलिकडून तोच, तिला ऐकायचा नव्हता तो, गगनचा आवाज आला. तिनं कसंबसं कॅब मागवायला सांगितलं

गगन
रेवाचा नुसता आवाज ऐकूनच त्याच्या छातीत धडधड झाली. ११ ऑलरेडी वाजून गेले होते. कंपनीच्या बाहेरही सामसुम झाली होती. त्यानी कॅबवर काम करणाऱ्या एका मित्राला फोन करून बोलावलं. आणि ड्युटीवरच्या दुसऱ्या एका सिक्युरिटी गार्डलाही केबिनमध्ये बोलावून घेतलं.

------------
रात्री ११.४५
------------

रेवा कंपनीच्या मेनगेटपाशी आली. कॅब उभी होती. कॅब ड्रायवरशी बोलत गगन उभा होता. तिला काय करावं कळेना. अर्थात गेटपाशी अजून एक दोन गार्डस होते म्हणून न घाबरता कॅब जवळ गेली.

गगन तिच्याशी बोलायला लागला, "मॅडम, कंपनी का रूल है, रात को दस बजे के बाद कोईभी लेडी स्टाफ को कॅबसे अकेले नहीं भेज सकते। किसी सिक्यरिटी वाले को साथ जाना ही पडता है"

रेवाच्या हातापायातं त्राण गेलं. काय करावं काही सुधरेना. एवढ्यात गगन म्हणाला, "तो ये पाटिल अंकल आपके साथ आएंगे" त्यानी दुसऱ्या एका म्हाताऱ्या गार्डकडे बोट दाखवून सांगितलं आणि म्हणाला, "टेन्शन मत लेना मॅडम। अंकल ठीक से पहुंचा देंगे"

रेवा मनातल्या मनात देवाचा धावा करत कॅब मध्ये बसली. कॅब निघून गेली.

------------
रात्री १२
------------

राघव त्याच्या कार मधून मेनगेट पाशी आला. थांबला. गाडीतून उतरला. गगनला बोलावलं आणि विचारलं, "वो मेरी टीममेट कहां है?". गगन त्याची नजर टाळून म्हणाला, "वो तो कॅब से चली गयी सर, पाटील अंकल साथ मे है"

राघवनी त्याला एक सणसणीत कानाखाली मारली आणि म्हणाला,

"मादरचोद, कॅबसे क्यों भेजा उसे? तुझे बोला था ना आज कॅब मत बुलाओ कर के"

राघव गाडीत बसून तणतण करत निघून गेला. आणि गगन आपला गाल चोळत, रेवाला निदान आज तरी या सैतानाच्या तावडीतून वाचवलं या समाधानात पुन्हा सिक्युरिटी केबीनमध्ये गेला.

Average: 7.7 (3 votes)