रामायणात सीता भूमीत गुप्त झाली
जाशील तू कुठे गं, भूमीच लुप्त झाली
आता पराभवांची काहीच बोच नाही
पाहून रक्त माझे चंडी प्रतप्त झाली
आले भरून जेंव्हा आभाळ वाकलेले
तेंव्हा कशी धरेची इच्छा विरक्त झाली?
आता जगू कसा मी, नाहीत श्वास माझे
स्वप्ने खुणावणारी केंव्हाच जप्त झाली
देउ अता कुणाचा आधार जीवनाला
मागेच जाणीवांची स्फूर्ती अशक्त झाली
प्याला इथे सुखाचा आता कसा भरू मी
दुर्दैव, जीवनाची सुरईच रिक्त झाली