तेजवेडा जीव

प्रसाद शिरगांवकर

मी कधी शुध्दीत होतो? नेहमी धुंदीत होतो!
ऐकले नाही कुणाचे माझिया मस्तीत होतो!

दाटतो सार्‍या दिशांना होउनी मी मेघ काळे
मी सदा माझ्याचसठी पावसाची प्रीत होतो

राजवाड्यांची कधी मी कौतुके केलीच नाही
आजही मातीत आहे, नेहमी मातीत होतो

आजही माझे मला ते वागणे खातेच आहे
बेगडी बंदूक होती, मी जयाला भीत होतो!

तेजवेडा जीव माझा पाहिला नाहीस का तू?
त्या तुझ्या पूजेतही मी तेवत्या ज्योतीत होतो

Average: 8 (28 votes)