प्रसाद शिरगांवकर

भलतेच काहि आज मी बोलून गेलो
सर्व काहि सत्य मी सांगून गेलो

तारका ती आजही आलीच नाही
आवसेने मी पुन्हा गांजून गेलो

जीवनाचे वार मी झेलू कशाला
काल ही हे युद्ध मी झुंजून गेलो

ते जरी करतात काव्याची उपेक्षा
गीत ओठांतील मी गाउन गेलो

जी कधी नव्हतीच माझी त्या दिशेला
कोण जाणे मी कसा धावून गेलो

देह माझा हीच होती बंदिशाला
थोडक्या देहात मी मावून गेलो

राग त्यांना आजही आहेच माझा
जे नको ते सर्व मी जाणून गेलो

भूतकाळाचा अता नाहीच झोका
मी स्मृतींचे दोरही कापून गेलो

कोळशाचा रंग आता लाल आहे
मी निखार्‍यासारखा पेटून गेलो

अंतरी उमटे न आता काव्य काही
जन्मणारे शब्द मी कोंडून गेलो

तापली होतीस तू धरणीप्रमाणे
मेघ झालो, मी पुन्हा सांडून गेलो

कोणते आकाश देउ दान आता
वामनाला सर्व मी देउन गेलो

कौतुके करता कशाला अर्जुनाची
सोयर्‍यांचे बाण मी झेलून गेलो

दाह हा आला कसा माझ्या नशिबी
मोगर्‍याने काल मी पोळून गेलो

Average: 8.3 (15 votes)