नाही कुणीच माझ्या सत्यास जाणणारे
आहेत सर्व येथे खोटेच कुंथणारे
ते लोक कोण जाणे मज भेटतील केंव्हा
श्वासांत मोगर्याच्या गंधास गुंफणारे
तू जीवनात माझ्या आलीस का उशीरा
देउ नको खुलासे, काही न सांगणारे
शोधुन विश्व सारे ही खंत एवढी की
नाही कुणीच माझ्या स्पर्शास झेलणारे
माझ्या पराक्रमांची ना कौतुके कुणाला
नाही कुणीच येथे गीतेस जाणणारे
माझ्या आमंत्रणाची कोणास चाड नाही
मेहूण ना मिळाले, पूजेत जेवणारे
घेउन नाव माझी गेलो जिथे जिथे मी
होते तिथे खलाशी दर्यात हिंडणारे
आहे अजून येथे साम्राज्य पौरसांचे
नाही सिकंदराला कोणीच जिंकणारे
ते कालचेच रस्ते, त्या कालच्याच आशा
ते कालचेच माझे तारे खुणावणारे
एकेक श्वास माझा देतो अता हजेरी
मिस्त्री नव्या दिशांचे नावे पुकारणारे
बेरंग मैफलीचा हा दोष ना कुणाचा
हे ढोलकेच माझे बेताल वाजणारे