स्वप्नास पांघराया...

प्रसाद शिरगांवकर

ओठांस लाव राणी प्याला रिता कराया
ओतीन जीव माझा प्याला पुन्हा भराया

हे मद्य संपण्याची भीती तुला कशाला
ओठांस स्पर्शुनी ते लागेल मोहराया

नाकारशील माझे सारे उधाण राणी
(पण) लागेल वेळ थोडा काहूर ओसराया

थंडीत एकट्याने तू झोपशील तेंव्हा
माझेच चांदणे घे स्पप्नांस पांघराया

डोळ्यांत आठवांचा दाटेल मेघ माझ्या
धावून ये सखे त्या मेघास सावराया

Average: 8.1 (20 votes)